मनमाड : पुण्यातील बस स्थानकात युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड बस स्थानकाताल सुरक्षेकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे मनमाड बस आगार हे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वपूर्ण व मध्यवर्ती आहे. तसेच मनमाड रेल्वे स्टेशन जंक्शन असल्याने बस स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. यात प्रामुख्याने विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकात येतात. मनमाड बस स्थानकातून ते शिर्डीला मार्गस्थ होतात. यामुळे मनमाड स्थानक नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रस्थानी राहिले आहे. या ठिकाणी बस स्थानक आणि बस आगार असे दोन भाग आहेत. सध्या स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आगारात जाण्यासाठी मोठे लोखंडी प्रवेशद्वार असून रात्री हे प्रवेशद्वार बंद असते. मनमाड आगारात केवळ एक बस मुक्कामी असते. ती आगारात उभी असते.
संपूर्ण स्थानक आणि आगारात सहा सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. स्थानकाची वाहतूक नियंत्रण सेवा २४ तास कार्यरत आहे. आगार व्यवस्थापक यांचे निवासस्थान देखील आगाराच्या जवळच असल्याने त्यांचे देखील रात्रीच्या वेळी आगाराच्या नियंत्रणाकडे पूर्ण लक्ष असते. स्थानकात पोलिसांची गस्त रात्रीच्या वेळी होत असते. ही गस्त अधिक कडक करावी, असे पत्र शहर पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी आगारात प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक कार्यरत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आगाराच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जाते, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मनमाड बस स्थानक हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळेला बस स्थानकात कोणतीही बस उभी करून ठेवली जात नाही. ज्या काही बसेस आहेत. त्या आगारांमध्ये उभ्या करून ठेवलेल्या असतात. रात्री येथे सुरक्षारक्षक कार्यरत असतात. सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आगाराच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जाते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.विक्रम नागरे (आगार व्यवस्थापक, मनमाड)