नाशिक – राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत प्रस्तावित विद्यापीठावरून कार्यकारी मंडळ आणि अध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. सुमारे १२०० कोटींचे अंदाजपत्रक असणाऱ्या संस्थेत दोन वर्षांनी निवडणूक होणार आहे. विद्यापीठाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी विरोधी गट सरसावला आहे. संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसा्र कार्यकारी मंडळास या घटनाबाह्य विषयाला मंजुरी देण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा मांडला जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मविप्र संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. अध्यक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे कार्यकारी मंडळाने मविप्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयास मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर ठेवला आहे. विद्यापीठाच्या विषयावरून सभासदांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर या पदाधिकाऱ्यांकडून खासगी विद्यापीठाची गरज, खासगी विद्यापीठे अधिनियमातील तरतुदी, नेमणूक व अधिकार आदींची माहिती मांडली जात आहे. हजारो विद्यार्थ्यांना शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे, रोजगाराभिमुख, कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यापीठातून देता येईल. अल्पावधीत हे विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थितीकडे वाटचाल करेल. त्याच्या उत्पन्नातून संस्थेच्या इतर कमकुवत शाखांचा दर्जा सुधारण्यास हातभार लावता येईल. काळाची पावले ओळखून शिक्षणात होणारा बदल स्वीकारणे हे सर्वांच्या हिताचे असल्याकडे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.
दुसरीकडे कार्यकारी मंडळाने मंजूर केलेला विद्यापीठाचा विषय घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. संस्थेच्या घटनेनुसार संस्था विश्वविद्यालयीन शिक्षण देणारे महाविद्यालय काढू शकते, विश्वविद्यालय म्हणजेच विद्यापीठ काढू शकत नाही. याकडे लक्ष वेधत सभासद प्रणव पवार यांनी सभेतील हा विषय घटनाबाह्य असल्याचे नमूद करुन विरोध दर्शविला. कार्यकारी मंडळास घटनाबाह्य विषयाला मंजुरी देण्याचा अधिकार नाही. मविप्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संस्थेच्या घटनेतील ध्येय व उद्देश यामध्ये बदल करावे लागतील. घटना बदल करण्याचा अधिकार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आहे. त्यामुळे कार्यकारी मंडळाने मंजूर केलेला मविप्र विद्यापीठ स्थापनेचा विषय घटनाबाह्य व बेकायदेशीर ठरतो, याकडे लक्ष वेधत पवार यांनी त्यास हरकत घेतली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाची ही तिसरी वार्षिक सभा आहे. चौथ्या सभेनंतर पाचवी सभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवीन कार्यकारी मंडळाची होते. यामुळे तिसऱ्या सभेपासून निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागते. मराठा समाजाच्या बलाढ्य संस्थेतील सध्याचे वाद हे त्याचे निदर्शक असल्याचे काही जण सांगतात.