धुळे – लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या नागपूर येथील मध्यस्थ, नववधूसह चार जणांच्या टोळीस पोलिसांनी अटक केली. चौघाविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन मरगडे (रा.अंगझरी, नागपूर), काजल बारोट (२३, रा.शिरोही, राजस्थान), नेहा मेटकर (३३, रा.गांधीबाग. सीताबर्डी, नागपूर) आणि पूनम येती (३३, रा.शांतीनगर, नागपूर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित सचिन मरगडे हा मध्यस्थ (दलाल) तर नेहा मेटकर ही नववधू काजलची बहिण म्हणून आली होती. पूनम येती हिला लग्न लावून देण्यासाठी आणण्यात आले होते. पैकी काजलचे माहेरचे नाव काजल भलानी असे असून ती विवाहित आणि एका मुलाची आई असल्याचे कळते.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार खैरनार (३५, रा.धुळे) याच्या विवाहासाठी वधू शोधणे सुरु होते. तुषारच्या आईला वधू शोधून देणाऱ्या नागपूर येथील व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळाला. वर आणि वधू दोन्ही बाजूंमध्ये २१ ऑगष्ट रोजी संपर्क झाल्यावर मध्यस्थी व्यक्ती, उपवर वधू आणि तिची बहिण असे तिघे तुषारच्या घरी आले. मुलीला बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यस्थाने लग्न लावून देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मध्यस्थ आणि नववधूच्या बहिणीसाठी तुषारच्या कुटुंबाने एक लाख ३० हजार रुपये रोख आणि काही रक्कम ऑनलाईन पदतीने दिली. यानंतर तुषारचा विवाह काजल या मुलीशी धुळ्यातील देवपूर येथील आदिशक्ती श्री एकविरादेवी मंदिरात लावून देण्यात आले.
लग्न झाल्यावर दोनच दिवसात तुषारला त्याची पत्नी काजल हिचे वागणे संशयास्पद वाटले. त्याने तिच्या आधारकार्डची पडताळणी केली. यावरून काजल ही मूळची राजस्थान येथील असल्याचे प्रथमदर्शी उघड झाले. यानंतर तुषारने काजलचे समाज माध्यमातील खात्याची माहिती काढली असता त्यावरील फोटोत काजलच्या गळयात मंगळसूत्र आणि जवळ लहान मुलगा असल्याचे दिसले. यामुळे तुषारचा संशय अधिकच बळावला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील लोकांना विश्वासात घेवून तुषारने ही सगळी माहिती त्यांना सांगितली.
या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तुषारच्या कुटुंबियांनी पुन्हा एका मुलाच्या लग्नासाठी मुलगी दाखवा, अशी मागणी संबंधित मध्यस्थाकडे केली. त्याने उज्जैन येथील पूनम नावाच्या मुलीला आणले. मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यावर या लग्नासाठी दीड लाख रुपयांची मागणी मध्यस्थाकडून करण्यात आली. त्यामुळे आपणास फसविण्यात आले असल्याची जाणीव तुषार खैरनार आणि त्याच्या कुटुंबाला झाली. त्यांनी एक सप्टेंबर रोजी चाळीसगाव रोड पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत मध्यस्थ सचिन मरगडे, काजल आणि काजलची बहीण असल्याचे सांगून संपर्कात आलेली नेहा, तसेच उज्जैन येथील नववधू म्हणून आलेली मुलगी पूनम यांना बोलावून घेतले. खैरनार कुटुंबाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चारही जणांना ताब्यात घेतले. चौघा संशयितांविरुद्ध पोलिसांनी फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्यासह हरिश्चंद्र पाटील, निलेश चव्हाण, विनोद पाठक, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, पंकज वाघ, माधुरी हटकर आणि सोनाली हटकर यांनी केली.