नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानंतर्गत शिक्षण विभागातर्फे दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे २३ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “माझी शाळा – माझा अभिमान” हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने शैक्षणिक साहित्यासह रोख देणगी असा तीन कोटी ४१ लाख रुपयांचा निधी संकलन करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह अन्य प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतलेल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेशी पुन्हा जोडण्याचा, शाळेच्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि शाळेबद्दल अभिमानाची भावना दृढ करण्याचा हेतू या मोहिमेमागे होता.
या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे, शाळा स्वच्छता व रंगरंगोटी, वृक्षारोपण, ग्रंथदान असे उपक्रम घेण्यात आले तसेच शिक्षणोपयोगी साहित्य, क्रीडा साहित्य, टीव्ही, ध्वनीक्षेपक संच, आरओ फिल्टर, सौर ऊर्जा संच, सोलर लाइट्स यांसारख्या वस्तू माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भेट म्हणून देण्यात आल्या. अनेक शाळांनी या योगदानातून आपला परिसर सुशोभित केला असून गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमाद्वारे जिल्हाभरात केवळ शाळांचा विकासच नव्हे, तर ग्रामीण भागातील शिक्षणाविषयीची आत्मीयता पुन्हा जागृत झाली, प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि “माझी जिल्हा परिषद शाळा” हा शब्द अभिमानाने उच्चारला. “माझी शाळा – माझा अभिमान” हे अभियान म्हणजे विद्यार्थी आणि शाळा या भावनिक बंधांची पुनर्निर्मिती करणारा यशस्वी प्रयोग ठरला असुन राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणार आहे.
“आपल्याला घडविणाऱ्या शाळेला काहीतरी परत द्यायची भावना प्रत्येकाच्या मनात असते. ‘माझी शाळा – माझा अभिमान’ या उपक्रमाद्वारे ती भावना कृतीत उतरविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला, गावाचा आत्मा म्हणजे शाळा, आणि शिक्षण हा विकासाचा पाया आहे हा संदेश या अभियानातून जिल्ह्याने दिला आहे.” – ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक
