मनमाड : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मनमाड-नाशिक मार्गावर सर्व पॅसेंजर गाडय़ांच्या जागेवर आता मेमू लोकल गाडय़ा धावणार असल्याचे भुसावळ येथे झालेल्या मेमू लोकल गाडीच्या प्रशिक्षणावरून निश्चित झाले आहे. सध्या मुंबई ते भुसावळ आणि भुसावळ ते मुंबई, भुसावळ ते देवळाली, मनमाड ते इगतपुरी आणि इगतपुरी ते मनमाड अशा पाच पॅसेंजर धावत आहेत. या गाडय़ांची जागा मेमू गाडय़ा घेतील.

मागील आठवडय़ात भुसावळ विभातील सर्व तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी यांना मेमूच्या बाबतीत प्रशिक्षण देण्यात आले. भुसावळ विभागातील तांत्रिक विभागाचे डेपो, मनमाड, भुसावळ, बडनेरा, अमरावती येथे असून त्यातील सुमारे ६० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील साहाय्यक विभागीय तांत्रिक अभियंता ए. एम. राजपूत यांनी प्रशिक्षण दिले. मेमू २०० ते ३०० किलोमीटर अंतरासाठी सहज धावणारी असल्याने तिचा आनंद केवळ नाशिक पुरताच मर्यादित न राहता आता भुसावळपर्यंतच्या प्रवाशांना घेता येणार आहे. मेमू प्रकारच्या लोकलसाठी फलाटाची उंची हा मोठा अडसर होता. परंतु मेमू प्रकारच्या लोकलला अडीच फूट खालपर्यंत पायऱ्या असल्याने फलाटाची उंची कमी- जास्त असली तरी चालणार आहे.

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने
Cycle track Palm Beach route
सायकल ट्रॅक की वाहनतळ? पामबीच मार्गालगतच्या बहुचर्चित सायकल ट्रॅकचे ११.५८ कोटी रुपये वाया जाणार
tanker caught fire on mumbai ahmedabad national highway
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ऑईल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग

मेमू लोकलमुळे प्रवाशांना टी-१८ रेल्वेसारखी सुविधा मिळणार आहे. मेमू एका तासात १३० ते १८० किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. पश्चिम रेल्वेवर मेमू प्रकारची लोकल दिवा-वसई-विरार मार्गावर सुरू आहे. आरामदायी गाडीत एकूण २६१८ प्रवासी प्रवास करू शकतात. मेमू गाडीत ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’ लावल्याने ३५ टक्के ऊर्जेची बचत होणार आहे. प्रत्येक डब्यात दोन शौचालयांची सुविधा असणार आहे. चालक कक्षापासून तातडीचा संवाद साधण्याची सुविधा राहील. टी-१८ रेल्वेच्या धर्तीवर लोकलमध्ये आणि चालक कक्षाबाहेर सीसी टीव्ही असणार आहे. जीपीएसवर आधारित प्रत्येक थांब्यावर ध्वनिक्षेपकावर स्थानकाची माहिती देणारी यंत्रणा लावण्यात आली आहे.

दरम्यान, येथील विभागीय रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी जानेवारीमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकीत या मार्गावर मेमू लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले. कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देऊन येत्या काही दिवसांत मेमू लोकल धावणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.