जळगाव – राज्यात महायुतीचे सरकार असताना भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात एवढ्या तेवढ्या कारणांवरून धुसफूस सुरूच आहे. त्यात काही मंत्री वादग्रस्त विधाने करून सरकारला आणखी अडचणीत आणण्याचे काम करताना दिसत आहेत. अशा या परिस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप थोडा वेगळा करत असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिले.
जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बळकटीकरण, कार्यकर्ता सशक्तीकरण तसेच अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी जळगावमध्ये रविवारी भाजपची संघटनात्मक अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या ठिकाणी उपस्थित जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आगामी काळातील पक्षाचे धोरण, केंद्र व राज्य सरकारची लोकहितकारी कामगिरी आणि मतदारसंघातील विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्वांनी करावे, असेही आवाहन त्यांनी केले. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वबळावर, याबाबतीत अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. तत्पूर्वीच, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी आपापल्या पातळीवर स्वबळाचे नारे देण्यास यापूर्वीच सुरूवात केली आहे. कोणताच पक्ष जागा वाटपावरून तडजोड करण्याच्या मनःस्थितीत दिसून आलेला नाही. असे असताना, मंत्री गिरीश महाजन यांनीही जळगावमधील पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांवर भाजपची एकहाती सत्ता मिळविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आतापासून तयारीला लागण्याचे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा दावा देखील मंत्री महाजन यांनी केला. या वेळी आपल्याला संपूर्ण राज्यात नवीन विक्रम नोंदवायचा आहे. तुम्हाला सर्व सामग्री दिली जाईल. मात्र, तुम्ही कुठे कमी पडू नका, असेही त्यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना म्हटले. जळगाव महापालिकेत कुणाचेही नगरसेवक नसतील, तेवढे भाजपचे असतील. राज्यात कोणत्याच पक्षाकडे नसतील तेवढ्या नगरपालिका जिल्ह्यात भाजपकडे असतील. आणि हाचा आपल्याला कित्ता जिल्हा परिषदेतही गिरवायचा आहे. मतदार आपल्या बाजुने असताना तुम्ही मागे वळून बघू नका, असा कानमंत्र त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. गेल्या वेळी जळगाव महापालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले होते, यावेळी बहुमताचा आकडा खूप पुढे घेऊन जायचा असल्याचे त्यांनी नमूद केले.