नाशिक – शासकीय आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहात रिक्त असलेल्या जागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्वरीत नेमणूक करावी, या मागणीसाठी आमदार नितीन पवार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी कळवण तालुक्यातील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयासह परिसरातील काही शाळांना कुलूप लावले. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, त्यांची परवड याकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन व चार यांचे २० दिवसांपासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन परिसरात बिऱ्हाड ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यात उमटण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप आदिवासी आश्रमशाळांमध्ये अध्यापन बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक असले तरी त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे. काही जण आंदोलनात तर, काही ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
अध्यापन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला गळती लागली आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना जाब विचारावा तरी कोणाला, या संभ्रमात असलेल्या पालकांनी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, आमदार नितीन पवार तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना साकडे घातले. संबंधितांकडून १५ दिवस आधी कळवण एकात्मिक प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेतील स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. परिस्थिती न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
या प्रकल्पातंर्गत ४७ शाळा आहेत. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिने होऊनही शिक्षक नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. आदिवासी आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. सोमवारी त्यानुसार आमदार पवार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पाला कुलूप लावत कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला. यानंतर प्रांत अंकुरी नरेश यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. पुढील पंधरा दिवसात परिस्थिती पूर्ववत होऊन अध्ययनास सुरूवात होईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे आमदार पवार यांनी नमूद केले.