नाशिक – मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले होते. सध्याच्या घडामोडींवर केवळ एकच व्यक्ती उत्तर देऊ शकते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे त्यांचे म्हणणे आहे. मनसेतून मराठा आंदोलनावर आता वेगळी भूमिका समोर येत आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पत्र पाठवून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात राज्यातून हजारो आंदोलक मुंबईत धडकले आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, असे सांगितले जात होते. मग मराठा आंदोलक मुंबईत का आले, या सर्व गोष्टींची माहिती शिंदे हेच देऊ शकतील, याकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. आता पक्षातील अन्य पदाधिकारी आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.

प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात विविध विषयांकडे लक्ष वेधले. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वैचारिक, सामाजिक प्रगतीत मराठा समाज कायम अग्रेसर राहिला. मराठा समाजाने ओबीसी समाजाचे आरक्षण आम्हाला द्यावे, असेही कधी म्हटले नाही. परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय असे सांगितले जाते. हा दाखला देत पाटील यांनी जातीजातीत तेढ कोण निर्माण करतेय, असा प्रश्न केला.

सनदशीर मार्गाने मराठा समाज आपल्या हक्कासाठी आंदोलन करत असताना त्यांना शिवीगाळ, दमबाजी व आरक्षण मिळू नये म्हणून न्यायालयात जाणे वा उपोषणाला परवानगी मिळू नये म्हणून अर्जफाटे कोण करतेय, ही कटकारस्थाने करणारी मंडळी कोण आहेत, असे प्रश्न केले. ओबीसी नेत्यांना उपोषण व मोर्चा काढायला लावणारे सर्व लोक आपल्याच पक्षाचे दिसतात, असा आरोप त्यांनी केला. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात पक्षात पक्ष, जातीत जात, माणसात माणूस भावात भाऊ, कोणी ठेवला नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.

मुंबईतील आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकही शब्द बोलत नाही, त्यांच्यावर कसला दबाव आहे का, असा संशय निर्माण झाला आहे. मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. सरकारने आंदोलकांना सुविधा मिळू नये म्हणून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. त्यांना कुठल्याही सुविधा पुरविल्या नसल्यावरून आपल्याला मराठा समाजाचा खूपच राग आहे व हे मराठा समाजालाही माहित आहे असे मनसेचे दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.