अंजनेरी संवर्धन राखीव व्यवस्थापन समितीची स्थापना
वन विभागाने संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिल्यामुळे अंजनेरीवरील जवळपास ३५० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्याच्या जबाबदारीसाठी अंजनेरी संवर्धन राखीव व्यवस्थापन समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सर्वपरिचित आहे. या परिसराची दुसरी ओळख म्हणजे दुर्मीळ वनस्पतींची. शिवाय अंजनेरीतील डोंगराच्या कडेकपारीत गिधाडांचे अस्तित्व आहे. गिधाडांची घरटी तसेच त्यांचा आढळ असलेले हे ठिकाण लुप्त होण्याच्या स्थितीत आहे. वन विभागाच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी पर्यावरण संशोधक जुई पेठे यांनी अंजनेरीवरील वनस्पतींचा अभ्यास केला होता. या अभ्यासाच्या आधारे वन विभागाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरीतील ५.६९ चौरस किलोमीटरचे क्षेत्र संवर्धन राखीव करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता.
२०१४ मध्ये सादर झालेल्या या प्रस्तावाला वन विभागाने मान्यता देत हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून जाहीर केले आहे. तसेच अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पेठे यांच्यासह नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकचे विश्वरूप रहा, निसर्ग पर्यटन मंडळाचे अरुण शिंदे, निसर्ग मित्र मंडळाचे एकनाथ शिंदे, कृषी व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पेठे यांनी केलेल्या अभ्यासानुसार अंजनेरी डोंगरावर तब्बल साडेतीनशेहून अधिक वनस्पती आहेत. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाट आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशा काही वनस्पती या ठिकाणी मात्र अद्याप तग धरून आहेत. कमी मातीच्या थरात अनेक वैशिष्ठय़पूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कंद, कीटकभक्षी वनस्पती आहेत. परंतु वाढत्या पर्यटनामुळे त्यांच्याही अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. या डोंगरावर भाविकांबरोबर भटकंतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.
या क्षेत्रातील माणसांचा मुक्त वावर वनस्पतींचे अस्तित्व नष्ट करू शकणारा ठरू शकतो, याकडे अभ्यासात लक्ष वेधण्यात आले. अंजनेरीवरील विशिष्ट भाग संवर्धन राखीव म्हणून जाहीर झाल्यामुळे नष्ट होऊ पाहणाऱ्या वनस्पती व जैवविविधतेला नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जैवविविधतेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या सोबतीने हे काम करावे लागेल. संवर्धन राखीव झाल्याने पुढील काही वर्षांच्या नियोजनार्थ व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. पर्यटन व तत्सम बाबींवर काही नियंत्रण आणता येईल, असे या समितीतील सदस्यांनी सांगितले.
दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन दृष्टिपथात
एखाद्या दुर्मीळ वनस्पतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका किती दुष्परिणाम घडवून आणू शकतो, यावर तिच्या संवर्धनाच्या कामाची निश्चिती होते. त्यासाठी ‘आययूसीएन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानके निश्चित केली आहेत. त्याकरिता संबंधित वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सिद्ध करावे लागते. अंजनेरी प्रकल्पात जुई यांनी त्या मानकांनुसार अभ्यास केला. परिसरातील आठ दुर्मीळ वनस्पतींना या संस्थेने आधीच त्या गटात स्थान दिले आहे. या अभ्यासामुळे ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अतिशय दुर्मीळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्यात यश आले आहे. एकदा मान्यता मिळून त्या यादीत संबंधित वनस्पतीचा समावेश झाला, की तिच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी व अन्य मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त होतो.