मनमाड : पाच महिन्याच्या आपल्या मुलीला बेदम मारहाण करणाऱ्या महिलेला जागरुक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून बालिकेची सुटका केली. समाजसेवक विलास कटारे यांनी पोलिसांच्या निदर्शनास सर्व प्रकार आणून दिला. पोलिसांनी परप्रांतात असणाऱ्या महिलेच्या कुटूंबियांशी संपर्क साधून तिला घेऊन जाण्यास सांगितले.

शहरातील कॅम्प भागात रस्त्याच्या कडेला एक महिला तिच्याजवळ असलेल्या लहान बाळाला बेदम मारहाण करत होती. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. शंका आल्याने त्यांनी समाजसेवक विलास कटारे यांच्याशी संपर्क साधला. कटारे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेकडे विचारपूस केली. सदर महिला दक्षिण भारतीय असल्यामुळे तिला भाषा समजत नव्हती. बाळ मारहाणीमुळे जोरजोरात रडत होते. उलगडा होत नसल्याने कटारे यांनी महिलेसह बाळाला घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले. पोलिसांना माहिती दिली. डॉक्टरांनी बाळावर उपचार केले. बाळाच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> ठेवीदारांना पैसे देणेही कठीण, एनपीए १३४२ कोटींवर; अडचणीतील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळाला मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन दुभाषिकांच्या मदतीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महिला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी महिलेच्या कुटूंबियांशी संवाद साधला. महिलेचे नाव लक्ष्मी मलय्या गंगव्वा (माहुरी, जिल्हा निजामाबाद, तेलंगणा) असे आहे. ती काहीअंशी मनोरुग्ण असून काही वेळा ती घरातून निघून जाते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी कुटूंबियांना तिला घेऊन जाण्यास सांगितले. समाजसेवक कटारे यांनी दाखविलेल्या समयसुचकतेचे शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले.