नाशिक – येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर झाला आहे.पुरस्काराचे स्वरुप ५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे. वाचनालयाच्या वतीने २० वर्षापासून राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कार्यक्षम आमदार पुरस्काराने गौरवण्यात येते. मागील दोन वर्षापासून पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून एक वर्षाआड हा पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिला जाऊ लागला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.
खासदार हेमंत गोडसे, पत्रकार प्रशांत रामदास, मंगेश वैशंपायन, संजय पाठक, डॉ. विनायक नेर्लिकर, डॉ. शोभा नेर्लिकर, डॉ. आर्चिस नेर्लिकर, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, गिरीश नातू, डॉ. धर्माजी बोडके यांच्या समितीने खासदार डॉ. पवार यांची कार्यक्षम खासदार पुरस्कारासाठी निवड केली. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे सावानाच्या वतीने सांगण्यात आले.