जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना २०१४ पासून भाजपशी युती करण्याबाबत चार ते पाच वेळा चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी येथे केला.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार गटाच्या भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयाचे समर्थन त्यांनी पुन्हा केले. पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही आम्ही मूळ विचारधारा कायम ठेवत पुढील राजकीय वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे, असे त्यांनी सांगितले. आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होण्यासाठी एकदा नाही तर चार ते पाच वेळा चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी केला.

२०१४ मध्ये मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावही पारित झाला होता. २०१६- २०१७ मध्येही आम्ही भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी होणार होतो, त्यादृष्टीने लोकसभेचे जागा वाटप देखील झाले होते. मी प्रदेशाध्यक्ष असल्याने सर्व वाटाघाट करत होतो. त्यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि आम्ही सरकारमध्ये जाऊ, असे आम्हाला अपेक्षित होते.

मात्र, शिवसेना सरकारमध्येच राहील, असे भाजपने ठामपणे सांगितले. २०१९ मध्येही सरकारमध्ये जाण्याची चर्चा दोन्हीकडे सुरू होती. भाजपकडूनही त्यासाठी पाऊले उचलली गेली होती. पण पुढे निर्णय झालाच नाही, असेही खासदार तटकरे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय ध्रुवीकरण सातत्याने घडत असते. २०१९ ते २०२४ या कालावधीच जितके राजकीय ध्रूवीकरण झाले तेवढे कधीच झाले नव्हते. आता यापुढे काय काय होते ते बघायचे आहे, असेही खासदार तटकरे यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांनी यांनी विविध घटकांना बरोबर घेतले आहे. विविध समाज घटकांना मंत्रीपद देत न्याय दिला आहे. ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे नेते आहेत, याचा अभिमान आहे. त्यांच्यावर टीका करणारे लोक दखलपात्र नाहीत, असे तटकरे म्हणाले.