नाशिक : विधानसभा निवडणुकीत १२०० मतदारांमागे एक मतदान केंद्र हे सूत्र होते. महानगरपालिका निवडणुकीत एका प्रभागात चार उमेदवार निवडून द्यावे लागतात. मतदानास वेळ लागू शकतो. त्यामुळे यावेळी ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यानुसार नाशिक विभागात २१ हजार ५७३ मतदान केंद्र राहतील. मागील निवडणुकीत १५ हजार ९४० मतदान केंद्र होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी मतदार केंद्राची संख्या निश्चित करणे, मतदार यंत्र आणि साहित्य. अतिरिक्त सोयी सुविधा, मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. दिवाळीनंतर महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुका टप्याटप्प्याने होतील. मनष्यबळाअभावी त्या एकत्रित घेणे शक्य नसल्याचे त्यांंनी स्पष्ट केले. बहुसदस्यीय प्रभागात मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावे लागते. यास लागणारा वेळ लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र हे सूत्र निश्चित करण्यात आले. यामुळे केंद्रांवर रांगा लागून मतदारांना ताटकळत रहावे लागणार नाही याचा विचार आयोगाने केला आहे. या बदलामुळे विभागात मतदान केंद्रांमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात ५० लाख ४५ हजार मतदार असून ४,९८२ मतदान केंद्रे आहेत. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदान याद्या विभाजित केल्या जातील. एक जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील. कुठले मतदार निश्चित करायचे आणि कुठले काढून टाकायचे, याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही. मतदार केंद्रनिहाय यादी विभाजनात चुकीने मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेला तर अशा चुका दुरुस्त केल्या जातील. मतदार यादी काटेकोरपणे विभाजित करावी. एका इमारतीतील मतदान वेगवेगळ्या केंद्राला जोडले जाऊ नये, असे यंत्रणेला सूचित करण्यात आल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात लोकसंख्या, मागील निवडणूकीवेळी असणारे मतदान केंद्र, संभाव्य मतदान केंद्र, तेथील सुविधा, मतदार यादी विभाजन आणि नियोजन आदींचा समावेश होता.
केंद्रांवंर सुविधांबाबत सूचना
मतदान केंद्रांवर सामान्य आणि अपंग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन संभाव्य किती मतदान यंत्रांची आवश्यकता लागणार आहे, याची मागणी नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले.