जळगाव : शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे बारा बलुतेदारांचा विकास थांबला असताना, महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या सर्व घोषणा आता हवेत विरल्या आहेत, अशी टीका नाभिक समाज महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी येथे केली. नाभिक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत महाज्योती सारख्या संस्थांनाही पुरेसा निधी दिला जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाभिक समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन जळगाव शहरात करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना कल्याणराव दळे यांनी बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यामुळे नाभिक समाजाचा विकास खुंटल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश सचिव पांडुरंग भंवर, महिला प्रदेशाध्यक्ष भारती सोनवणे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सलोने, किशोर सुर्यवंशी, सुनिलजी बोरसे, रविंद्र शिरसाठ, मावळते अध्यक्ष रवींद्र नेरपगार, उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, चंद्रकांत शिंदे, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत, सचिव संजय पवार आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी स्नेह मेळाव्याचे उद्घाटन केले.
स्नेह मेळाव्यात नाभिक महामंडळाच्या पश्चिम आणि पूर्व विभागातील नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम विभागासाठी किशोर वाघ आणि पूर्व विभागासाठी सचिन सोनवणे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच कार्याध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे आणि सरचिटणीसपदी संजय पवार यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत करताना कल्याणराव दळे यांनी सर्व पोट जाती बाजूला ठेवून फक्त नाभिक या एका छत्राखाली एकत्र येण्याचे तसेच समाज हिताची कामे करण्याचे आवाहन उपस्थित सर्वांना केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार संत सत्यपाल महाराज यांना देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याबद्दल सुद्धा कल्याणराव दळे यांनी खंत व्यक्त केली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन मनोहर खोंडे यांनी केले. आभार अनिल शिंदे यांनी मानले. जगदीश वाघ, अरुण श्रीखंडे, जगदीश निकम, गणेश सानवणे, भरत चव्हाण, प्रशांत बाणाईत, भिकन बोरसे, अभय सुर्यवंशी, नरेश गर्गे, पंडीत संनासे, शांताराम सोनगिरे, उदय सोनवणे, वसंतराव साळुंखे, शिवाजी निकम, किरण नांद्रे, कैलास वाघ, आत्माराम शिंदे, विशाल निकम यांनी सहकार्य केले.