नाशिक – महाराष्ट्रातील दुष्काळी भागास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे १९११ मध्ये बांधलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणानजीक राज्यातील पहिल्या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त पक्षी गणना करण्यात आली. यामध्ये ११ हजारांहून अधिक पक्षी आढळून आले आहेत.

नांदुरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगांव अशा एकूण सात ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले. यात ११ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली. त्यात नऊ हजार २५३ पानथळ पक्षी, तर एक हजार ९२३ गवताळ भागातील पक्षी बघावयास मिळाले. स्थलांतरित ब्ल्यू चिक बीइटर, वॉटरकॉक, मार्श हेरिअर यां पक्ष्यांचे दर्शन झाले. तसेच काळा तपस, पिवळा तपस आणि लाल तपसही आढळून आले. पावसाळ्यात अभयारण्यात हळदीकुंकू, वारकरी, सूर्यपक्षी, जांभळी पानकोंबडी, राखी बगळा ,तांबट, राखीधनेश, मुनिया, स्टोनचाट, उघड्या चोचीचा बगळा, राखी बगळा, स्पॉटबिल डक, स्पुनबिल, ,शेकाट्या, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत.

हिवाळ्यात या परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ३१० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात. तसेच ६५ जातीचे मासे आणि ५०० पेक्षा जास्त वनस्पती देखील या अभयारण्यात आहेत. अभयारण्यातील विविध पक्षी निरीक्षण मचाणांवरून पक्षीमित्रांच्या सहकार्याने पक्षी गणना करण्यात आली.

सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनपाल रुपेश कुमार दुसाने, वनरक्षक जी. के. पाटील, के. डी.सदगीर, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, पक्षीमित्र सतीश गोगटे, उमेशकुमार नागरे, अनंत सरोदे, वन कर्मचारी अमोल दराडे,, गंगाधर आघाव, रोहित मोगल, विकास गारे, रोशन पोटे, प्रमोद मोगल, संजीव गायकवाड, सुनील जाधव, गणेश वाघ, पंकज चव्हाण, प्रमोद दराडे, एकनाथ साळवे,अमोल डोंगरे आदी सहभागी झाले होते.

थंडीची चाहुल लागली की अभयारण्य परिसरात स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरूवात होते. यंदा मे महिन्यापासून पाऊस सातत्याने असल्याने धरण परिसरात मुबलक स्वरूपात पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण परिसरातील जलाशय भरल्याने पक्ष्यांना अधिक प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. अभयारण्यात पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे गणनेमध्ये दिसून आले. अभयारण्य परिसरात पक्ष्यांना मुबलक खाद्य उपलब्ध झाल्याने स्थलांतरित पक्षी येण्यास देखील सुरवात झाली असून पर्यटकदेखील पक्षी बघण्यासाठी अभयारण्यात येत आहेत – हिरालाल चौधरी (वनपरिक्षेत्र अधिकारी)