नंदुरबार – पेव्हर ब्लॉकच्या आड ट्रॅक्टरमधून गोवा राज्यात निर्मित बनावट मद्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न अपघातामुळे फसला. या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा-कलसाडी रस्त्यावर पिंगाणे गावापुढे हा अपघात झाला. ट्रॉलीमधील लाखो रुपये किंमतीच्या दारुचे सुमारे ४०० हून अधिक खोके रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने दारूच्या बाटल्यांचा सडा रस्त्यावर पडला होता. अपघात घडल्यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दारूच्या खोक्यांची अक्षरश: लूट केली.

रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहादा-कलसाडी रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटला. या अपघाताची भीषणता एवढी होती की ट्रॉली उलटल्यामुळे त्याचा आवाज परिसरातील एक किलोमीटरपर्यंत गेला. या ट्रॉलीमध्ये वरुन पेव्हर ब्लॉक तर त्याखाली गोवा राज्यात निर्मित बनावट दारूचे सुमारे ४०० पेक्षा अधिक खोके ठेवण्यात आले होते. ट्रॉली उलटल्यामुळे पेव्हर ब्लॉक व दारुचे खोके रस्त्यावर पडले. चालक ट्रॅक्टरखाली अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – मालेगावात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबार

हेही वाचा – नाशिक: पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस अपघातात २७ प्रवासी जखमी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॉलीमधील पेव्हर ब्लॉक व मद्याचे खोके रस्त्यावर पडल्याने मद्याची लूट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी दारुचे खोकेच उचलून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. उपस्थित तसेच पोलिसांकडून दारु नेणाऱ्या नागरिकांना आवाहन केले जात असतानाही आरोग्यास हानिकारक असलेल्या मद्याची अक्षरश: लूट झाली.