नंदुरबार : राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात धडगाव पंचायत समितीच्या इमारत भूमीपूजन सोहळ्यावरुन श्रेयवादाची लढाई रंगली. एकाच इमारतीच्या भूमीपूजनाचे सोमवारी दोन कार्यक्रम झाले. आमदार आमश्या पाडवी यांनी श्रेयवादावरुन नाव न घेता भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांना लक्ष्य केले. मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण भूमीपूजन केल्याचा दावा त्यांनी केला. काहींना आजही आपण मंत्री, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याचे वाटत असल्याचा टोलाही पाडवी यांनी हाणला.

धडगावलगतच्या धनाजे ग्रामपंचायत हद्दीत एकरभर जागेत पाचकोटी ६३ लाख ४६ हजार रुपये खर्चून पंचायत समितीची इमारत बांधली जाणार आहे. सकाळच्या सत्रात धनाज गावाच्या रोजरीपाडा येथे सरपंच विजयाताई पावरा आणि उपसरपंच सेवंतीबाई पावरा यांच्याहस्ते भूमीपूजन झाले. यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, माजी खासदार डॉ. हिनाताई गावीत आणि जिल्हा परिषद माजी सदस्या डॉ. सुप्रियाताई यांनी विशेष प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. भाजपचे सुभाष पावरा, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. याच इमारतीचे दुपार सत्रात शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्यांनी आमदार गावीत परिवारावर टीका केली. हाजीर तो वजीर या उक्तीप्रमाणे मतदारसंघाचा आमदार म्हणून भूमीपूजन करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य, माजी सभापती, पंचायत समितीचे माजी सभापती,सदस्य उपस्थित होते. धडगाव पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. धडगावमधून जिल्हा परिषदेच तीन सदस्य निवडून गेले होते. विजयकुमार गावितांची कन्या माजी खासदार डॉ. हिना गावितांनी भाजपमधून बाहेर पडत विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. तिरंगी लढतीत आमश्या पाडवी यांनी बाजी मारली. त्यामुळेच आमश्या पाडवी आणि डॉ. गावीत यांच्यात कायमच वाकयुध्द रंगत आले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. विजयकुमार गावीत यांच्या दुसऱ्या कन्या सुप्रिया गावित होत्या. तर शिवसेनेचे धडगावचे नेते विजयसिंग पराडके यांचे धडगाव नगरपालिकासह तालुक्यावर प्रभुत्व आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या इमारतीच्या मंजुरीवरुन आता श्रेयवाद सुरु झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.