नंदुरबार – भरवस्तीत झालेल्या चाकु हल्ल्यानंतर हद्दपार आरोपींच्या टोळक्याने हल्लेखोराच्या घरात शिरुन महिलांवर चाकूने हल्ला केला. नंदुरबारमध्ये उपद्रवी मंडळींचे टोळीयुद्ध भडकले असतांना हद्दपारांचा शहरात वावर आणि यातून तक्रार देण्यास आलेल्यांवर शहर पोलीस ठाण्याबाहेरच दगडाने हल्ल्याचा प्रयत्न होणे, यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात चाकू आणि धारदार शस्त्रांचा सर्रासपणे होणारा वापर आणि या प्रकारांकडे पोलिसांकडून घेतली जाणारी बघ्याची भूमिका, यामुळे नंदुरबार शहर वेठीस धरले जात आहे.
नंदुरबार शहरात वाढती गुन्हेगारी आणि त्यातून भडकणारे टोळीयुद्ध आता थेट पोलीस ठाण्याच्या दाराशी येवून पोहचले आहे. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भय्या मराठे या युवकाने जयेश वळवी याच्यावर चाकू हल्ला करुन त्याला जखमी केले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. अतिशय वर्दळीच्या परिसरात झालेल्या या घटनेनंतर जयेश वळवी समर्थक टोळक्याने रायसिंगपुरा भागातील भय्या उर्फ सूर्यकांत मराठेच्या घरावर हल्ला केला. यात चाकूने हल्ला करण्यात आल्याने या घरातील एक महिला जखमी झाली.
मुळातच या टोळी युद्धानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हल्ला झालेला जयेश वळवी यास पोलिसांनी वर्षभरासाठी हद्दपार केले असल्याचे समजते. पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कार्यवाही झाली असतांना तो शहरात खुलेआम कसा फिरत होता, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या भय्या मराठेने हा हल्ला केला,त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्रांबाबत पोलिसांना कुठलीही माहिती असू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जयेश वळवीवर हल्ला झाल्यानंतर लगेचच त्याच्या समर्थक टोळक्याने देखील धारदार शस्त्राने मराठेच्या घरावर केलेल्या हल्ल्यात देखील वापरलेल्या गेलेल्या शस्त्रांबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मराठेच्या वहिनी या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) माजी नगरसेविका आहेत.
मराठे यांचे नातेवाईक शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी पोहचले असतांनाच त्यांच्या गाडीवर शहर पोलीस ठाण्याबाहेरच काही टोळक्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण खेडकर यांनी मध्यस्थी करत या टोळक्याच्या तावडीतून एकाची सुटका केली. शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे चार दिवसांच्या वैद्यकीय रजेवर असल्याने शहराचा प्रभार सहायक पोलीस निरीक्षकांकडे आहे. अशातच थेट शहर पोलीस ठाण्याच्या आवाराजवळ दहशत माजविण्याचा हा प्रकार म्हणजे पोलिसांचा शहरात धाक उरला नसल्याचेच प्रतिक म्हणावे लागेल.
या दोन्ही घटनानंतर हद्दपार आरोपीचे शहरात मोकाट फिरणे, गुन्ह्यात धारदार शस्त्रांचा वापर, टोळ्यांकडून शहरासह थेट शहर पोलीस ठाण्याच्या आवारापर्यत होणारी दमदाटी यातून नंदुरबारमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व घटनांप्रकरणी रात्री उशीरापर्यत उपनगर आणि शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी उपनगर येथील हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते.