सेनेच्या बैठकीकडे भाजपच्या नेत्यांची पाठ

नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत मतभेद शमविण्याची कसरत करणाऱ्या शिवसेनेला भाजपने झटका दिला आहे. नरेंद्र दराडे यांचा अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवली. इतकेच नव्हे तर, अर्ज भरतानादेखील भाजपचे कोणी उपस्थित नव्हते. या घडामोडींमुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

निवडणुकीत सेना-भाजप युती होईल की नाही, याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ शकत नसल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून दराडे तर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्यासह विविध पक्षांत भ्रमंती करणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष परवेझ कोकणी यांचाही समावेश आहे. काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेत मुख्य लढत होणार असल्याचे अटळ आहे.

अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी दुपारी संपुष्टात आली. मुदतीत अर्ज सादर करण्याची लगबग इच्छुकांसह समर्थकांमध्ये सुरू होती. शिवसेनेतून हकालपट्टी झालेले अ‍ॅड. सहाणे यांना अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने प्रवेश देऊन उमेदवारही केले. सहाणे यांची हकालपट्टी आणि संघटनात्मक पातळीवरील बदल यामुळे सेनेच्या गोटात आधीपासून अस्वस्थता आहे. काही दिवसांपूर्वी खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक नगरसेवकांनी दांडय़ा मारत त्याचे दर्शन घडविले होते. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मातोश्री येथे बैठक घेत एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश दिले. पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यासाठी नेत्यांना हस्तक्षेप करावा लागल्यानंतर सेनेला आता मित्रपक्ष भाजपला सोबत घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विधान परिषद निवडणुकीत सेना-भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. काही जागांवर भाजप, तर काही जागांवर सेनेने आपले उमेदवार दिले आहेत. नाशिक विधान परिषदेसाठी सेनेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने भाजपने थांबणे सोयीस्कर समजले. या स्थितीमुळे भाजपचे सहकार्य मिळेल, अशी आशा सेना बाळगून आहे.

त्या अनुषंगाने सेना-भाजप पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु या बैठकीकडे भाजपचा एकही पदाधिकारी फिरकला नाही. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. अनिल कदम, आ. योगेश घोलप, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख, नगरसेवक असे केवळ पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहिले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे दुर्लक्ष करत भुसे यांनी सेनेचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला.  चर्चा झाल्यानंतर नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या ठिकाणी भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपशी युती करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार नाही. सेनेचे वरिष्ठ नेते जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असे भुसे यांनी सांगितले. बैठकीसाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकांशी संपर्क साधला होता, परंतु एकही पदाधिकारी बैठक, अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिला नाही. काही पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क होणेही अवघड झाले होते. काही आमदारांनी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने पदाधिकारी मुंबईत गेल्याचा युक्तिवाद केला.

सेना-राष्ट्रवादीत लढत

विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण सात उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. शिवाजी सहाणे, तर शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, अपक्ष म्हणून यतींद्र पाटील, किशोर दराडे, अशोक आहेर, परवेझ कोकणी, ज्ञानेश्वर गायकवाड यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. दाखल झालेल्या अर्जाची ४ मे रोजी छाननी होईल. ७ मे ही अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर २१ मे रोजी मतदान होऊन २४ मे रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात एकूण ६४४ मतदार आहेत. त्यात नाशिक आणि मालेगाव महापालिकेचे अनुक्रमे १२७, ८९ मतदार आहेत. जिल्हा परिषदेचे ७३ आणि पंचायत समितीचे १५ सभापती यांनाही मतदान करता येईल. तसेच नऊ नगरपालिकेतील २१८, सहा नगरपंचायतींतील ११४ तसेच देवळाली छावणी मंडळाच्या आठ सदस्यांचा मतदार यादीत समावेश आहे.