मालेगाव : गेली काही दिवस मालेगाव मध्य व बाह्य या दोन्ही विधानसभा मतदार संघांमध्ये ‘मत चोरी’चा मुद्दा चांगलाच तापला आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी देखील आता यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे. महापालिका हद्दीतील प्रस्तावित ९ क्रमांकाच्या एकाच प्रभागाच्या मतदार यादीत जवळपास ३ हजार दुबार नावे आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या छायाचित्रांचा वापर करुन आणि पत्त्याचा उल्लेख टाळून मतदार यादीत नावे घुसडण्याची बनवाबनवी केली गेल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. प्रशासकीय आशीर्वादामुळेच हे घडले असावे,असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात ४२ हजारावर बोगस मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत,असा आरोप माजी आमदार व ‘इस्लाम’ पक्षाचे संस्थापक आसिफ शेख यांनी केला आहे. यात तब्बल २८ हजार मतदारांचे पत्ते नाहीत. ११ हजार जणांची नावे दुबार किंवा तिबार आहेत. साडेतीन हजार मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट आहेत,असे शेख यांच्या तक्रारीचे स्वरूप आहे. या संदर्भात शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांची भेट घेऊन ही सर्व नावे वगळण्यात यावीत तसेच त्यात दोषी असलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) कारवाई करावी असा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे मालेगाव मध्य व बाह्य या दोन्ही विधानसभा मतदार संघातील याद्यांमध्ये घोळ असल्याची तक्रार केली गेली होती. बोगस मतदान व नोंदणी टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराचे नाव सक्तीने आधार कार्डशी संलग्न करावे,अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.
माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ‘मत चोरी’ संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग रचनेत प्रस्तावित ९ क्रमांकाच्या प्रभागातील मतदार यादीबद्दल संशय आल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यावर अभ्यास केला असता अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. या यादीत अनेकांची दुबार नावे आहेत तर काहींची नावे चक्क चार वेळा असल्याचे आढळून आले आहे. हे करताना एकाच व्यक्तीचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे छायाचित्र वापरले गेले आहे. शिवाय मतदाराच्या पत्त्याच्या रकान्यात शुन्य किंवा नुसती रेष असे नमूद आहे. शेजारचा बागलाण मतदार संघ,धुळे व नाशिक शहरात असणाऱ्या मतदारांची अनेक नावे या प्रभागात घुसडण्यात आली आहेत,असे सोनवणे यांनी म्हटले आहे. मतदार यादीतील या दोषांमुळे बोगस मतदान होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ती लोकशाहीची क्रुर थट्टा ठरते. यासंदर्भात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवल्यावरही ही बोगस नावे वगळण्याची कारवाई अद्याप झालेली नाही. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर भविष्यात आपण न्यायालयीन लढाई लढू, असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे.