नाशिक : जिल्ह्यातील कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कनाशी येथे आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील सुमारे ५१ विद्यार्थिनींना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून औषधोपचारानंतर ४७ विद्यार्थिनींना आश्रमशाळेत परत पाठविण्यात आले. चार विद्यार्थिनी मात्र अजूनही आरोग्य केंद्रातच दाखल आहेत. अन्न किंवा दूषित पाण्यामुळे हा त्रास झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कनाशी येथील आश्रमशाळेतील १५ पेक्षा अधिक विद्यार्थिनींना पाच दिवसांपासून पोटदुखी, थंडी वाजणे, ताप येणे, जुलाब आणि खोकला यासारखा त्रास सुरु झाला होता. गुरुवारी असा त्रास इतरही विद्यार्थिनींना होऊ लागला. त्यानंतर ५१ विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या आदिवासी आश्रमशाळेस मध्यवर्ती स्वयंपाकघर ( सेंट्रल किचन) माध्यमातून बागलाण तालुक्यातील दहिंदुले येथील केंद्रातून अन्न पुरवठा केला जातो. हे अन्न आश्रमशाळेत उशिरा मिळत असल्याने त्याच्या दर्जावर परिणाम होतो. परंतु, विद्यार्थ्यांना तेच दर्जाहीन अन्न दिले जात असून विद्यार्थ्यांना सकस तसेच गरम अन्न देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून याआधीही करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना त्रास होण्यामागेही अन्नपुरवठा निकृष्ट असणे हे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बागलाण तालुक्यातील दहिंदुले येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून कनाशी आश्रमशाळेस जेवण पुरविण्यात येते. दहिंदुले येथून होणारा अन्न पुरवठा बंद करून कनाशी आश्रमशाळेतच अन्नाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार नितीन पवार यांनी कनाशीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विद्यार्थिनींच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्याशी चर्चाही केली. प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली. त्यानंतर प्रकल्प अधिकारी नरेश हेही आरोग्य केंद्रात दाखल झाले. आश्रमशाळेतील अन्नपदार्थ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यावरच विद्यार्थिनींना त्रास होण्यामागील कारण समजू शकेल, असे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे होणारा त्रास रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा कसा असतो, त्याची तपासणी नियमितपणे होणे गरजेचे असल्याचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करुन त्यांच्याकडून तपासणी झाल्यावरच विद्यार्थ्यांना अन्न देण्यात यावे, अशी सूचना यानिमित्ताने करण्यात येत आहे.