नाशिक : दिव्यामुळे शेतातील झोपडीस लागलेल्या आगीत ८२ वर्षांच्या वृद्धेचा जळून मृत्यू झाला. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे मध्यरात्री ही दुर्घटना घडली. झोपडीतील संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले.

याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. किकवारी येथील माता डोंगर शिवारात ही घटना घडली. काशिनाथ सोनवणे यांच्या शेतात हे झोपडीवजा घर होते. मध्यरात्री पेटत्या दिव्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत झोपडीत झोपलेल्या फुलाबाई पवार (८२) यांचा मृत्यू झाला. झोपडीत वृद्ध महिला एकटीच होती. रात्रीची वेळ असल्याने या घटनेची माहिती लवकर कुणाला समजली नाही. त्यामुळे मदतीसाठी कोणी आले नाही. झोपडी खाक झाली. आगीत झोपडीतील सर्व साहित्य भस्मसात झाले. या घटनेची माहिती वृद्ध महिलेच्या जावयाने सटाणा पोलिसांना कळवली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बाबत सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.