नाशिक : महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मुदत संपुष्टात येईपर्यंत एकूण ९१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात काही भागांचे विभाजन झाले असून ते एका विशिष्ट प्रभागात समाविष्ट करावे, काही परिसर दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करणे यासह अन्य हरकतींचा समावेश आहे. या हरकतींवर शुक्रवारपासून सुनावणी घेतली जाणार आहे. ही प्रभागरचना २०१७ मधील रचनेनुसार ठेवण्यात आलेली असल्याने हरकतींवर काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे साडेतीन वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. महानगरपालिकेत ३१ प्रभागात एकूण १२२ सदस्य असतील. यातील २९ प्रभाग चार सदस्यीय तर, १५ आणि १९ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत. २०१७ तील प्रभाग रचनेनुसार प्रभाग, सदस्य संख्या कायम आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली. मागील निवडणुकीत ही प्रभागरचना भाजपला फायदेशीर ठरली होती. प्रारूप प्रभाग रचनेवर मुदत संपुष्टात येईपर्यंत एकूण ९१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. पिंपळगाव खांबचा परिसर प्रभाग २२ व ३१ अशा दोन ठिकाणी विभागला गेला आहे. तो प्रभाग ३१ मध्ये कायम ठेवावा, अशी हरकत आहे.
प्रभाग १३ मधील श्रमिकनगर, गंजमाळ, झंकार हॉटेल परिसर, एन. डी. पटेल रोड, पंचशिल नगर, भद्रकाली परिसरातील मातंगवाडा व तलावाडी परिसर किस्मतबाग कब्रस्तान येथील वस्ती सदर परिसर प्रभाग १४ मध्ये जोडण्यात यावा, अशी हरकत घेण्यात आली आहे. प्रभाग २६ आणि २७ वरही हरकत घेण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मसूद जिलानी यांनी एक ते ३१ अशा सर्वच प्रभागातील सदस्य संख्येबाबत हरकत घेतली आहे. अखेरच्या् दिवशी प्रभाग २१, ११ व १२, २२ ३१, १६ व १७ आणि २२ व ३१ या प्रभागांबाबत हरकती प्राप्त झाल्या. एकूण हरकतींमध्ये प्रभाग २२ व ३१ बाबत सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींचा अभ्यास निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सुरू झाला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर पाच ते १२ सप्टेंबर या कालावधीत शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून सुनावणी घेतली जाणार आहे.
भाजप इच्छुकांकडून हरकती कमी ?
महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असल्याने इच्छुकांमध्ये उत्साह आहे. त्याचे प्रतिबिंब प्रारुप प्रभाग रचनांवर घेण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील हरकतींमधून दिसून आले. महापालिकेत प्रशासकांच्या हातात कारभार जाण्याआधी भाजपची एकहाती सत्ता होती. २०१७ मध्ये असलेली प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडली होती. तीच प्रभाग रचना यावेळीही कायम ठेवण्यात आली आहे.