राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

नाशिक : ८०० मीटर धावण्यात यमुना लडकतने तर, पाच हजार मीटर धावण्यात आदेश यादवने सुवर्णपदक पटकावून येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्य अ‍ॅथलेटिक्स  निवड चाचणी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. या स्पर्धेवर नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे, सातारा येथील खेळाडूंनी ठसा उमटविला. पतियाळा येथे २५ ते  २९ जून या कालावधीत होणाऱ्या ६० व्या  राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडीकरिता येथे दोन दिवस स्पर्धा झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजता झालेल्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकच्या आदेश यादवने १४.२० अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय धावपटू किसन तडवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या पाच हजार मीटर धावण्यात निकिता राऊत आणि प्राजक्ता गोडबोले या नागपूरच्या धावपटूंनी अनुक्र मे सुवर्ण आणि रौप्य मिळविले. लांब उडीमध्ये मुंबई उपनगरच्या  अनिलकुमार शाहूने प्रथम तर, शुभम पाटेकरने दुसरा क्रमांक मिळवला. २०० मीटर धावण्यात मुंबई उपनगरच्या राहुल कदमने सुवर्ण तर, ठाण्याच्या अक्षय खोतने रौप्यपदक मिळविले. ८०० मीटर धावण्यात पुण्याच्या अजिंक्य मांजरेने प्रथम तर, संग्राम भोईटेने दुसरा क्रमांक मिळविला. भालाफेकमध्ये औरंगाबादच्या अनिल घुंगसेने, हातोडाफेक प्रकारात साताऱ्याच्या  शिवम जाधवने आणि स्नेहा जाधवने प्रथम क्रमांक मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत— तुंगार हिने निवड समिती प्रमुख म्हणून कामगिरी पार पाडली. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना  मार्गदर्शन  करणार असल्याचे तिने सांगितले. महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करतील आणि निदान तीन ते चार खेळाडू ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवतील, असा विश्वास स्पर्धा आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी व्यक्त केला. स्पर्धेसाठी पांडे यांना राहुल  शिरभाते आणि सहकाऱ्यांची साथ मिळाली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik aadesh yadav yamuna ladak gold medal ssh
First published on: 18-06-2021 at 00:32 IST