नाशिक : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने श्रावणातील प्रत्येक सोमवारसाठी जादा बससेवेचे नियोजन केले आहे. नाशिक, इगतपुरी तसेच पेठ येथून ही बससेवा राहणार आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. देशाच्या विविध भागातून भाविक येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास धार्मिकदृष्ट्या महत्व असल्याने शिवभक्तांची गर्दी होत असते. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठीही भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये नाशिक ते त्र्यंबक २५, इगतपुरी ते म्हसुर्ली, वैतरणामार्गे त्र्यंबक पाच, पेठ ते अंबोलीमार्गे त्र्यंबक तीन, याप्रमाणे ३३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी तिसऱ्या सोमवारी अधिक गर्दी होत असल्याने ११ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. दरम्यान, ई बसही त्र्यंबक रस्त्यावर धावणार आहे. भाविकांनी महामंडळाच्या जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविक रविवार पासूनच त्र्यंबकेश्वर मध्ये येण्यास सुरूवात करतात. रविवारी सकाळ पासून त्र्यंबक नगरी फुलण्यास सुरूवात होते. रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस अंगावर घेत शिवभक्तांची परिक्रमा सुरू राहते. भाविकांची गैरसाेय होऊ नये या करता फेरी मार्गावर शिवभक्तांसाठी अल्पोहार, वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवभक्तांना पिण्याचे पाणी, चहा आदीची व्यवस्था करण्यात येत आहे. या फेरी मार्गावर शेतकऱ्यांची अतिक्रमणे तसेच अन्य शेतकऱ्यांच्या पीकांची नासधुस होऊ नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे.
पोलीसांनी फेरी मार्गासह त्र्यंबक शहर परिसरात गस्त वाढविली असून बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, शहर पोलीसांच्या वतीने सोमवार निमित्त त्र्यंबक रस्त्यावर भाविकांची होणारी गर्दी पाहता वाहतुक नियोजना सुरूवात केली. रविवारी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबक नगरीत दाखल होणार असल्याने गर्दीचा उच्चांक गाठला जाईल असा विश्वास व्यक्त होत असतांना मंदिर देवस्थान व पोलीस गर्दीचे नियोजन कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.