नाशिक : नांदगाव, मनमाड आणि येवला नगर परिषद निवडणुकीवरून महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गट हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला बरोबर घेण्यास तयार नाहीत. तर अजित पवार गट शिवसेना शिंदे गटालाच प्रतिस्पर्धी मानतो. या स्थितीत उभयतांनी भाजपने आपल्याबरोबर यावे म्हणून प्रयत्न चालविले आहेत. या अनुषंगाने सोमवारी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पाठोपाठ अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन तसा आग्रह धरला.

जिल्ह्यातील ११ नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या ठिकाणी ११ नगराध्यक्षांची थेट निवड आणि २६६ नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. नाशिक दौऱ्यावर असणारे मंत्री महाजन यांची प्रारंभी आमदार सुहास कांदे यांनी भेट घेतली. नांदगाव, मनमाडमध्ये अजित पवार गटाला वगळून शिवसेना शिंदे गट व भाजप युतीची मागणी त्यांनी केल्याचे सांगितले जाते. नांदगाव विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली होती. त्यांना कांदे यांनी पराभूत केले. आ. कांदे-भुजबळ यांच्यातील वादाचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पडले आहे.

आ. कांदे हे भेट घेऊन गेल्यानंतर तासाभरात समीर भुजबळ यांनी मंत्री महाजनांची भेट घेतली. नांदगाव, येवला आणि मनमाडमधील स्थिती मांडून भाजप व अजित पवार गटाने एकत्रित निवडणूक लढविण्याची मागणी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी नांदगाव, मनमाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आम्ही विरोधक असून त्यांच्याशी युतीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीची येवला व नांदगावमध्ये ताकद आहे. नगराध्यक्षपदासाठी आम्ही प्रमुख दावेदार असून नगरसेवकांच्या जाागांविषयी भाजपशी चर्चा करता येईल असे त्यांनी सूचित केले.

या घटनाक्रमावर मंत्री महाजन यांनी दोघांची भूमिका आपण समजून घेतल्याचे नमूद केले. उभयतांशी चर्चा केली. दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही प्रस्ताव ठेवले. महायुती म्हणून एकत्र राहिले पाहिजे. मंगळवारपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या तिढ्यात भाजप कोणाबरोबर जाणार, या प्रश्नावर महाजन यांनी भाजपबरोबर कोण असेल, हा विषय असल्याचे सूचक विधान केले. शिंदे गटाचे आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात किती प्रेमाचे संबंध आहेत, त्याची तुम्हाला कल्पना आहे. ते वेगळे सांगायला नको. दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यावर मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यात महायुतीचा झेंडा जोरात फडकेल, असा दावा महाजन यांनी केला.