नाशिक – एकेकाळी महाराष्ट्रातील अग्रगण्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये गणना होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड सहकारी साखर कारखान्याची आता संपूर्ण रया गेली आहे. कधीकाळी वैभवशाली असलेला निसाका आता आचके देत आहे. कारखाना आणि कारखान्याच्या जमीन विक्रीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून हालचाली सुरु झाल्याने कारखाना आणि जमीन वाचविण्यासाठी सभासद आणि कामगार पुढे आले आहेत. या प्रकरणात निफाडचे माजी आमदार अनिल कदम आणि शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील कामगारांच्या मुलांच्या शिष्टमंडळाने खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना निसाका वाचविण्यासाठी साकडे घातले आहे.
नाशिक येथे संजय राऊत आलेले असताना माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत ठाकरे गटाचे नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील आणि निसाका कामगारांची मुले किरण वाघ, योगेश आढाव, नितीन निकम यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. निसाका विक्रीचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून निसाका गिळंकृत करण्याच्या हालाचाली होत असल्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले.
संजय राऊत यांनीही निफाड साखर कारखान्याविषयी सर्व काही जाणून घेतले. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगत याबाबत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संजय राऊत यांना शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, किरण वाघ, योगेश आढाव, नितीन निकम यांनी निवेदन दिले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख दत्तु भुसारे, सुभाष आवारे, दशरथ रुमणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, निफाड सहकारी साखर कारखाना वाचविण्यासंदर्भात माजी आमदार अनिल कदम यांनी आता पुढाकार घेतला आहे. निसाका भाडेकराराने दिल्यानंतर तीन हंगाम उलटूनही सुरू करण्यात आला नाही. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून निफाड साखर कारखान्याची उर्वरित जमीन व इतर मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू असून सभासद व कामगार संघटनेने त्याविरोधात लढा पुकारला आहे. या लढ्याला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे अनिल कदम यांनी म्हटले आहे.
याअंतर्गत १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता निसाका कार्यस्थळावर सर्वपक्षीय सभासद, कार्यकर्ते आणि कामगारांची बैठक होणार आहे. या बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी केले आहे.