नाशिक -महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिक येथे दिला होता. त्यास सत्ताधारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण सत्तेत असतांना आरक्षण आणि कर्जमाफी याबाबत काय केले, असा प्रश्न मंत्री महाजन यांनी केला.

येथील महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या उद्घाटन सोहळ्यानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुळे यांचा पक्ष सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफीबाबत काही केले नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार असतांना आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यामुळे सुळे यांना बोलण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारच्या वतीने शेतमालांचे पंचनामे सुरू आहेत. याशिवाय सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे. विरोधकांकडे आता कोणतेच काम राहिलेले नाही. कुंभमेळाविषयक कामे रखडल्याची विरोधकांची टीका आहे. कुंभमेळ्याची त्यांनी काळजी करू नये. कुंभमेळा व्यवस्थित होईल. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मदत करत आहोत. सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडला नाहीत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्ही केले आहेत.

आता निवडणुका असल्याने तुम्ही मोर्चा काढत आहात, असा टोला महाजन यांनी हाणला. ओबीसी समाजावर आरक्षणाविषयी कुठलाही अन्याय होणार नाही, असा महाजन यांनी दिलासा दिला. मनोज जरांगे यांना जे पाहिजे होते, ते दिले आहे. कायद्याच्या चौकटीत त्यांना ते दिले आहे . काहीजण न्यायालयात देखील गेले आहेत . याबाबतदेखील आम्ही सरकार म्हणून ताकतीने उभे राहू, असे आश्वासन महाजन यांनी दिले. कुंभमेळ्याच्या कामात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व काम व्यवस्थित सुरू आहे. निधी उपलब्ध होईल, तशी कामे होत राहतील, असे महाजन यांनी नमूद केले.