नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या वतीने एक नोव्हेंबरपासून सिटीलिंक शहर बससेवेत प्रवाशांकडून व्यावसायिक सामानाची चढ-उतार होत असेल तर त्यासाठी निश्चित भाडेपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. शहरासह जवळील ठिकाणी सिटीलिंकतर्फे सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत एकूण ५६ मार्गांवर २४४ बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. शहरापासून २० किलोमीटरच्या आत येणार्या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेणा, सय्यद पिंप्री, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, सायखेडा अशा ग्रामीण भागातही सिटीलिंक बससेवा चालू आहे. या ग्रामीण भागातून शहराकडे अनेक प्रवासी व्यवसायानिमित्त येतात. सोबत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सामान असते. त्यामुळे अशा व्यावसायिक सामानावर तिकीट आकारणी करण्याचा निर्णय सिटीलिंकच्यावतीने घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>> “माघारी फिरा अन् संसदेत बोला”, शिंदे गटातील खासदारावर मराठा आंदोलकांचा रोष

प्रवासी सामानाची तिकीट दर आकारणीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशाकडे १० किलोपर्यंत सामान असेल तर त्यासाठी कोणतीही जादा दर आकारणी करण्यात येणार नाही. त्यापुढील प्रत्येकी १० किलोग्रॅमला त्या प्रवासाच्या पूर्ण तिकीटाची आकारणी करण्यात येईल. यामध्ये ११-२० किलोसाठी एक प्रवासी भाडे, २१-३० किलोसाठी दोन प्रवाश्यांचे भाडे याप्रमाणे आकारण्यात येईल. प्रवासादरम्यान व्यावसायिक सामान जवळ बाळगल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. व्यावसायिक सामान असल्यास ०-१० किलोसाठी एक प्रवासी भाडे, ११-२० किलोसाठी दोन प्रवासी भाडे, २१-३० किलोसाठी तीन प्रवासी भाडे याप्रमाणे दर आकारणी होईल. व्यावसायिक सामान बसमधून नेताना इतर प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची सदर प्रवाशाने दक्षता घ्यावयाची आहे. कोणत्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ बसमधून नेता येणार नाही. ( उदा. पेट्रोल, गॅस सिलिंडर, कुठलेही स्फोटक पदार्थ ), प्रवाशांस कायद्याने वाहतुकीस मनाई करण्यात आलेले साहित्य, सामान, पदार्थाची वाहतूक करता येणार नाही. प्रवास करतांना, दुर्गंधी येणारे पदार्थ, साहित्य, सामान वस्तु यांची वाहतूक करता येणार नाही. बससेवेतून पाळीव प्राण्यांची वाहतूक करता येणार नाही, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आता सिटीलिंकमधून प्रवास करताना अतिरिक्त सामान बाळगल्यास तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान बाळगणाऱ्या प्र्वाश्यांनी वाहकासोबत कोणताही वाद न घालता नियमांनुसार तिकीट काढून सिटीलिंकला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.