नाशिक – चातुर्मास सुरू झाल्याने पूजाविधींमध्येही वाढ झाली आहे. अशा विधींसाठी नारळ आवश्यक असल्याने त्यांची मागणी आणि किंमतींमध्येही शहरात घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात वाढ झाली आहे.पुजेमध्ये कलश मांडणीसह अन्य काही विधींसाठी नारळाला मागणी असते. याशिवाय खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. पुजेनंतर खाद्यपदार्थ तयार करतांना खोबऱ्याचा प्रामुख्याने वापर होतो. खोबऱ्याचा किस, खोबऱ्याचे काप, ओल्या नारळापासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात.

काही दिवसांपासून नारळाचे दर सातत्याने वाढत आहेत. २० ते २५ रुपयांना मिळणारे नारळ सध्या ३५ रुपयांपर्यंत पोहचले आहे. खोबरे २८०-२९० रुपये किलोवरुन ३६० रुपयांपर्यंत गेले आहे. याचा परिणाम नारळाशी संबंधित सर्वच खाद्यपदार्थांवर झाला आहे. मिठाईंमधून खोबरे गायब होण्यास सुरुवात झाली असून अन्य पर्याय वापरले जात आहेत. अनेक किराणा दुकानांमध्ये नारळापासून तयार होणारा खाद्यतेलाचा जुनाच माल आहे. नव्याने मागणी नोंदवूनही माल आणि नारळ आलेले नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याविषयी नाशिक जिल्हा धान्य व्यापारी संघाचे प्रफुल्ल संचेती यांनी माहिती दिली. घाऊक बाजारात ओले नारळ ३१. २५ रुपये या किंमतीाला आहे. हे नारळ किरकोळ बाजारात ३५ रुपयांनी विकले जात आहे. खोबरे ३६० रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहे. खाद्यतेलासह अन्य तेलांच्या किंमती वाढल्या आहेत. अन्य राज्यातून नारळ, खोबरे येत नसल्याने हे दर वाढले आहेत. सध्या सणवाराचे दिवस असल्याने नारळाला विशेष मागणी असल्याचे संचेती यांनी सांगितले. विक्रेत्यांकडे सातत्याने मागणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी नारळांचा पुरवठा होत आहे. त्यातही ५० नारळांची मागणी केल्यास २० नारळ मिळत आहे. यातही गोणी संपत येईपर्यंत काही नारळ शिल्लक राहिल्यास जो नफा होतो, तोही निघून जातो. गणेशोत्सवात नारळाचे दर ५० रुपयांपुढे जातील, अशी शक्यताही किराणा दुकानदारांनी व्यक्त केली.