नाशिक – शहरात थंडीची लाट आली असून सोमवारी तापमानाने ९.६ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली. मागील हंगामात ३० नोव्हेंबरला ८.९ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मागील आठ वर्षातील तो सर्वात थंड दिवस ठरला होता. सध्याच्या घटत्या तापमानाने गतवर्षीचा नीचांकी तापमानाचा विक्रम मोडीत निघतो की काय, याची उत्सुकता वाढली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडीने मुक्काम ठोकल्याने यंदा अधिक काळ थंडीची अनुभूती मिळण्याची चिन्हे आहेत.

टळटळीत उन्हाळ्यानंतर मेच्या मध्यापासून नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण हंगामात मुसळधार पाऊस झाला. पावसाने निरोप घेतल्यावर अवकाळीने हजेरी कायम ठेवली. बदलत्या हवामानाने थंडीचा हंगाम कसा राहील, याकडे सर्वांचे लक्ष होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. डिसेंबर, जानेवारीत नाशिकमध्ये कडाक्याची थंडी असते.

यंदा नोव्हेंबरच्या मध्यावर तशी स्थिती निर्माण झाली असून दिवसाही कमालीचा गारठा जाणवत असल्याने हुडहुडी भरल्याची स्थिती आहे. कडाक्याच्या थंडीने शालेय विद्यार्थी, नोकरदारांना उबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दिवसाही उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतो.

मागील सात दिवसांपासून तापमान १० ते ११ अंशाच्या दरम्यान होते. रविवारी सकाळी १०.१ अंशाची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पारा ९.६ अंशापर्यंत खाली घसरला. तापमान घसरण्यामागे उत्तरेकडील बर्फवृष्टी आणि मध्य प्रदेशमधील शीतलहरीचा नाशिकच्या वातावरणावर पडलेला प्रभाव हे कारण असल्याचे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून थंडीने मु्क्काम ठोकल्याने थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहे.

मागील काही वर्षात नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची आकडेवारी पाहिल्यास ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वात कमी म्हणजे ८.९ तापमानाची नोंद झाली होती. हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार ११ नोव्हेंबर २०१६ रोजी शहरात ८.८ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यापुढील (२०१७) वर्षात नोव्हेंबर महिन्यात पारा १०.२, २०१८ मध्ये १०.८, २०१९ मध्ये १३.८, २०२० वर्षात १०.४, २०२१ मध्ये १२.२, २०२२ मध्ये ९.२ अंश आणि गेल्या वर्षी (२०२३) नोव्हेंबरमध्ये तापमान १४.१ या नीचांकी पातळीवर गेले होते.

या वर्षी नाशिकचा पारा सध्या ९.६ अंशावर आला आहे. नोव्हेंबर संपुष्टात येण्यास आणखी १३ दिवसांचा अवधी आहे. पुढील काळात पारा आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त होते. तसे झाल्यास मागील नऊ वर्षातील नीचांकी तापमानाचा नवीन विक्रम प्रस्थापित होईल. परंतु, पुढील काळात वातावरणातील स्थितीवर ते अवलंबून आहे.