नाशिक – नाशिकच्या हवामानात झपाट्याने बदल होत असून १० दिवसांत तापमान साडेसात अंशांनी घसरले. शनिवारी पारा १०.३ अंशावर आला असून हंगामातील ही नीचांकी पातळी आहे. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसाही कमालीचा गारठा जाणवत असून सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे.
या वर्षी प्रदीर्घ काळ मुसळधार पावसाची अनुभूती घ्यावी लागल्यानंतर नाशिक जिल्ह्यात अलीकडेच थंडीची चाहूल लागली होती. गेल्या गुरुवारी पारा १८.२ अंशावर असताना दाट धुक्याची दुलई पसरली होती. एरवी दिवाळीनंतर थंडी जाणवू लागते. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव स्थानिक वातावरणावर पडत असतो. डिसेंबर, जानेवारीत कडाक्याच्या थंडीची अनुभूती मिळते. यंदा नोव्हेंबरमध्ये तशी स्थिती निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
मागील हंगामात ३० नोव्हेंबरला ८.९ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. हा दिवस मागील आठ वर्षात नोव्हेंबर महिन्यातील सर्वात थंड दिवस ठरला होता. सध्या सलग सहा दिवसांपासून तापमान १० ते ११ अंशादरम्यान आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर पारा इतका घसरल्याने पुढील काळात तो कोणती पातळी गाठेल, याबद्दल उत्सुकता आहे. थंडीचे आगमन झाल्यामुळे जॉगिँग ट्रॅक व व्यायामशाळेत गर्दी वाढत आहे. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्टीपथास पडते.
उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर तापमान १० अंशाच्या जवळ आल्याने यंदा अधिक काळ थंडीचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. थंड हवेसाठी ओळखले जाणारे नाशिक हिवाळ्यात चांगलेच गारठते. या वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल झाले. हवामान विभागाच्या मते तापमान एकदम कमी झालेले नाही, ते हळूहळू खाली आले. गेल्या पाच नोव्हेंबरला पारा १८ अंशावर होता. दुसऱ्या दिवशी त्यात किंचित वाढ होऊन सात तारखेला तो १४.२ अंशापर्यंत खाली आला.
पुढील सलग दोन दिवस तो आणखी थोडा कमी होऊन १० नोव्हेंबर रोजी १०.८ अंशाची नोंद झाली होती. तेव्हापासून १० ते ११ अंशाच्या दरम्यान तापमान स्थिरावलेले आहे. सध्या नाशिकचे तापमान घसरण्याचा संबंध उत्तरेकडील बर्फवृष्टी आणि मध्य प्रदेशमधील शीतलहरीशी आहे. मध्य प्रदेशमध्ये सलग तीन दिवसांपासून शीतलहर आहे. भौगोलिक दृष्टीने नाशिक हे मध्य प्रदेशशी निकट असून तेथील शीतलहरीचा परिणाम नाशिकच्या हवामानावर झाल्याचे हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ सांगतात.
