नाशिक : भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ भाजप नेत्यांच्या पुढाकारातून निघालेल्या तिरंगा फेरीनंतर सोमवारी काँग्रेसने शहरात तिरंगा फेरी काढली. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी काँग्रेस भवन येथून शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे सचिव राहुल दिवे, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, उल्हास सातभाई, माजी सभागृह नेते राजेंद्र बागूल, शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर आदींच्या उपस्थितीत तिरंगा फेरीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हाती ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी, भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, अशा घोषणा लिहिलेले फलक होते. भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी, कॅप्टन ह्युमिका सिंग यांच्या प्रतिमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हुतात्मा स्मारक येथे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. शहीद जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सेवा दलाच्यावतीने मानवंदना संचलन करण्यात आले.