नाशिक – आडगाव येथे जत्रा हॉटेल परिसरातील समर्थनगरात टोळक्याने एका धर्मगुरुंसह दोघांवर हल्ला चढविला. यावेळी फायबरचे दांडके, तलवारीचा वापर करण्यात आला. हल्ल्यात तीन जण जखमी झाले.
याबाबत इमानुएल रॉबर्ट अँथनी (सेंट थॉमस चर्च, शिवाजी रोड) यांनी तक्रार दिली. अँथनी हे शनिवारी रात्री नऊ वाजता समर्थनगरातील फादर फ्रॉकलिन अनुप यांच्या घराकडे पायी जात असताना पाठीमागून २० ते २५ वयोगटातील दोन युवक आले. कुठलेही कारण नसताना एकाने फायबरच्या दांडक्याने मारहाण केली.
दुसरा संशयित तलवार घेऊन धावून आला. यामुळे घाबरलेल्या अँथनी यांनी आरडाओरड केली. फादर फ्रॉकलीन अनुप यांना मदतीसाठी आवाज दिला. तेव्हा फादर फ्रॉकलीन आणि त्यांचे मित्र अलेन कॉर्नल घराबाहेर आले. अँथनीच्या बचावासाठी त्यांनी धाव घेतली. त्यावेळी आणखी दोन अनोळखी युवक आले. टोळक्याने फायबर दांड्याने फादर फ्रॉकलीन यांना तर ॲलेन कॉर्नल यांना तलवारीचे वार करुन जखमी केले. अँथनी यांना एकाने धमकी दिली. या हल्ल्यात ॲथनी, फ्रॉकलीन आणि ॲलेन कॉर्नल हे तिघे जखमी झाले. कॉर्नल हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून महिलेला पेटविले
कौटूंबिक वादातून मुलाने आपल्या आईवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा प्रकार फुलेनगर भागात घडला. यात ४३ वर्षीय महिला गंभीर भाजली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नंदा गायकवाड (गल्ली क्रमांक सहा, फुलेनगर ) यांनी तक्रार दिली. गौतम ताठे (२२, शिवाजी चौक, नाशिक) आणि त्याचा मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. गायकवाड यांचा संशयित ताठे हा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. संशयित मुलगा ताठे हा आपल्या मित्रास घेऊन महिलेच्या घरी आला होता. दोघांमध्ये चर्चा सुरू असतांना कौटूंबिक वादातून मायलेकांमध्ये वाद झाले. संतप्त मुलाने आपल्या आईला घरात लोटून देत तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या घटनेत महिला गंभीर भाजली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
शहर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. पहिला अपघात सातपूर औद्योगिक वसाहतीत जेबीएम कंपनीसमोर झाला. कृष्णा वैद्य (२९, कॅनॉलरोड, गंगापूर शिवार) हा युवक शनिवारी रात्री महिंद्रा चौकातून बॉश कंपनीच्या दिशेने दुचाकीवर निघाला होता. पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरा अपघात दिंडोरी रस्त्यावरील मेरी प्रवेशद्वार भागात झाला. सातपूर येथील जगदिश कानडे (५३, विश्वासनगर, अशोकनगर) हे मंगळवारी सकाळी दिंडोरी रस्त्याने दुचाकीने जात असताना मेरी प्रवेशद्वार परिसरात भरधाव दुचाकी घसरून कानडे जखमी झाले होेते. लेखानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.