नाशिक : शहरात सर्वत्र होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने २२ रस्त्यांलगत आणि सहा रस्ताबाह्य असे एकूण २८ वाहनतळ कार्यान्वित करण्यासाठी राबविलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर प्रारंभी अपेक्षित प्रतिमाह ३५ लाखांच्या उत्पन्नात कपात करून ते १९ लाख ५२ हजार रुपयांवर आणले आहे. वाहनतळ प्रकल्प व्यवहार्य ठरण्यासाठी प्रस्तावात बदल करण्यात आले. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून शक्य तितक्या लवकर शहरातील २८ वाहनतळे सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शहरात प्रमुख रस्त्यांसह लहान-मोठ्या रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. परिणामी रस्त्यांची वहनक्षमता कमी होऊन सर्वत्र वाहतूक कोंडी होते. याआधी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने २९ रस्त्यावर आणि सहा रस्त्याबाह्य वाहनतळासाठी निविदा काढली होती. ज्या ठेकेदाराला हे काम मिळाले तो न्यायालयात गेला. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने वाहनतळ प्रकल्प स्मार्ट सिटीकडून काढून स्वत:कडे घेतला. त्या अंतर्गत प्रचंड वर्दळ असणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या भागात २२ आणि सहा रस्ताबाह्य वाहनतळाची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले. रस्त्यांलगतच्या वाहनतळांवर १८५० आणि रस्त्याबाह्य वाहनतळांवर ४५५ वाहने लावण्याची व्यवस्था होणार आहे. वाहनतळाच्या १५० ते २०० मीटर परिघात ना वाहनतळ क्षेत्र तयार केले जाईल. याठिकाणी उभी केलेली वाहने महापालिका वाहतूक पोलिसांच्या मदतीने उचलून नेणार आहे.

ठेकेदारांशी चर्चा झाल्यानंतंर या वाहनतळांपोटी महापालिकेने ३५ लाख रुपये प्रतिमहिना उत्पन्न गृहीत धरले होते. त्याआधारे निविदा प्रसिद्ध केली. मुदतीत निविदा न आल्याने तिला मुदतवाढही दिली गेली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, वाहतूक तळांची सुविधा आवश्यक आहे. यामुळे वाहनतळाच्या प्रस्तावात बदल करावा लागला. या संदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. त्यानुसार मनपाच्या मिळकतीस उत्पन्न किमान मूलभूत दराच्या आधारे १९ लाख ५२ हजार ४१२ रुपये दरमहा येते. मक्तेदारास स्पर्धात्मक परिस्थितीत उच्चतम दराची निविदा पात्र केली जाईल. सुधारित प्रस्तावास मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली. वाहनतळ प्रकल्प व्यवहार्य ठरण्यासाठी हे बदल करावे लागले.

वाहनतळ नसल्याने रस्त्यांची बिकट स्थिती झाली आहे. कुठेही वाहने उभी केली जातात. लहान-मोठ्या सर्वच रस्त्यांवर कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या स्थितीत सप्टेंबरअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये वाहनतळ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.