नाशिक – महागाईची सतत ओरड होत असली तरी त्याचा कोणताही परिणाम यंदाच्या दसऱ्यानिमित्त झालेल्या खरेदीवर झालेला नसल्याचे दिसून आले. जीएसटी कपातीचा मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला गवगवा आणि वाहन कंपन्यांनी त्यासंदर्भात जाहिरात केल्याने उच्चवर्गासह मध्यमवर्गाचीही पावले दसऱ्याच्या दिवशी वाहन खरेदीकडे वळली. त्यामुळे एकट्या नाशिक शहरातून ११०० मोटारींची तर, ३५०० दुचाकींची विक्री झाली. त्यामुळे एकंदरीत शहरातील रस्त्यांवर आता ४, ६०० पेक्षा वाहने धावणार आहेत. दिवाळीही जवळ आल्याने त्यावेळीही वाहन खरेदी जोरात होणार असल्याची चिन्हे आहेत. इतक्या वाहनांची भर पडणार असल्याने नाशिकचे रस्ते या वाहनांचा भार पेलण्यासाठी सक्षम आहेत का, हा प्रश्न आहे.

दसरा आणि दिवाळीला खरेदी ही शुभ मानली जात असल्याने अनेक जण या सणांवेळी कोणती ना कोणती खरेदी करतात. कोणी वाहनांची, तर कोणी घरांची, कोणी सोने खरेदी करतात. यंदाच्या दसऱ्यावर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सावट असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे व्यावसायिकही धास्तावले होते. अर्थात, अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम ग्रामीण भागात जाणवला. ग्रामीण भाग अजूनही नुकसानीच्या धक्क्यातून सावरलेला नाही. त्यामुळे दसरा ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी निराशाजनकच गेला.

नाशिक शहरात मात्र खरेदीची धूम उडाली. अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणे तसेच विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर सवलती जाहीर केल्याने त्याचा परिणाम दसऱ्याच्या दिवशी खरेदी वाढण्यावर झाला. सर्वाधिक तेजी वाहन बाजारात दिसून आली. दसऱ्याला सकाळपासून वाहनांच्या दालनांसमोर अभूतपूर्व गर्दी झाली होती. ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे व्यावसायिकही हरखून गेले होते. काही मोटारी शिल्लकच नसल्याने त्या दसऱ्याला देता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे काही ग्राहकांची निराशाही झाली.

नाशिकमध्ये ग्राहकांच्या गर्दीमुळे वाहन बाजार ओसंडून वाहत असल्याने नवीन मोटार घेऊन बाहेर पडणेही अवघड जात होते. नाशिकमध्ये दसऱ्यानिमित्त विक्री झालेल्या मोटारींची संख्या ११०० पर्यंत गेली. त्यात ५० लाखांवरील १६ मोटारींचा समावेश आहे. नव्या चकचकीत मोटारीचे भलामोठा हार घालून स्वागत करण्यात येत होते. या हाराची किंमतही एक ते तीन हजार रुपयांदरम्यान होती. दुचाकी विक्रीही सुसाट झाली. साडेतीन हजाराहून अधिक दुचाकींची विक्री झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे. मागील वर्षाच्या दसऱ्यापेक्षा यंदाचा दसरा वाहन बाजारासाठी दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असा लाभदायक ठरला.