नाशिक – शहरातील द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नव्या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्यावतीने हे काम करण्यात येणार आहे. या कामास किमान दोन वर्षाचा अवधी लागणार असल्याने कुंभमेळ्याआधी ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर आहे. शिवाय, उड्डाणपुलाचे खांंब, जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिन्या सांभाळून हे काम करण्याचे आव्हान आहे.
मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्ग यांचा संगम होणारा द्वारका चौफुली हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर शहरात उड्डाणपूल बांधूनही द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा तिढा सुटला नाही. उलट दिवसागणिक तो बिकट होत आहे. अलीकडेच मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका चौकात अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या ठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाची माहिती घेतली. करावयाच्या उपाययोजनांबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मनपा वाहतूक कक्षाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांवर ठपका
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघत नसल्याची संपूर्ण जबाबदारी वाहतूक पोलिसांवर असल्याचे छगन भुजबळ यांनी सूचित केले. रस्त्यात मालमोटारी उभ्या केल्या तर वाहतूक अडकणार. सिग्नलवर वाहने पुढे येऊन थांबतात. लहानसहान गोष्टींबाबत वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिल्यास या अडचणी दूर होतील, असे त्यांनी नमूद केले.
आव्हाने कोणती ?
द्वारका चौकात भुयारी मार्ग विकसित करतांना सर्व बाबींचा काटेकोरपणे अभ्यास करावा लागणार आहे. उड्डाण पुलाचे खांब, जलवाहिनी, सांडपाणी वाहिन्या आडव्या येतात. त्यांना टाळून तो भुयारी मार्ग काढावा लागणार आहे. आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे. कुठे अडचणी येतील, हे भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले. यावर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडून अभ्यास केला जात आहे. या कामासाठी किमान दोन वर्षांहून अधिक काळ लागेल, असे भुजबळ यांनी नमूद केले. त्यामुळे कुंभमेळ्यात या प्रकल्पाचा लाभ होण्याची शक्यता कमी मानली जाते.
मार्ग कसा असणार ?
द्वारका चौकात नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना ८०० मीटरचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने हलकी वाहने ये-जा करू शकतील. या मुख्य भुयारी मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक देखील जोडली जाईल. यासाठी वडाळा नाका येथे ३०० मीटरचा दुसरा भुयारी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होईल.