नाशिक – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर आला असून या उत्सवाला पर्यावरणपूरक करण्यासाठी येथील वयोवृध्द विमल वसमतकर यांनी पुढाकार घेतला आहे. वयाच्या ७३ व्या वर्षातही त्यांचा राखी तयार करण्याचा उत्साह हा तरूणाईला लाजवेल असा आहे. यंदा त्यांनी २५०० पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या असून त्या सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाठवल्या आहेत.
काही वर्षांत पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी विमलताई यांना अस्वस्थ करीत होती. याविषयी काय करता येईल, याचा विचार ते करु लागले. लग्न समारंभ किंवा अन्य शुभकार्यात कोणी साडी अथवा कापड देतात. त्यामुळे घरात नकोसा असलेला कपड्यांचा ढिग तयार झाला होता. त्यातूनच त्यांनी १० वर्षात स्वखर्चाने १६ हजार ५०० कापडी पिशव्या तयार केल्या. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्यांचे मोफत वाटप केले. दुसरीकडे पर्यावरणपूरक रक्षाबंधनासाठी पुढाकार घेतला.
आवळा, पेरू, चिंच, बोर, सीताफळ यासह वेगवेगळ्या झाडांच्या बिया वर्षभर संकलित करुन कापडाच्या तसेच कागदाच्या राख्यांमध्ये त्यांचा वापर केला. याआधी विमलताई अहमदाबाद येथे वास्तव्यास होत्या. त्या ठिकाणी शाळा, सार्वजनिक ठिकाणी त्या राख्यांचे वितरण करीत असत. दोन वर्षांपासून त्या नाशिकमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत असून त्यांना या कामात त्यांची सून शर्मिला यांची मदत होते. कापडी पिशव्या तयार करण्यासाठी सासुबाईंनी पुढाकार घेतल्याचे शर्मिला यांनी सांगितले.

सासुबाईंनी १६ हजाराहून अधिक कापडी पिशव्या शिवल्या असल्याचा त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. राखी तयार करतांना त्या पुठ्ट्यावर लोकरीच्या मदतीने आवरण तयार करतात. त्यावर बियांचे नक्षीकाम करतात. किचकट काम असले तरी त्यांचा उत्साह, संयम यामुळे हे काम वर्षभर सुरू राहते. त्यांना आम्ही मदत करतो. यंदा अडीच हजार राख्या तयार केल्या असून त्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.