अमावस्या संपल्यानंतर नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. अमावस्येच्या भीतीने उमेदवार अर्ज भरण्यास टाळाटाळ करत होते. दोन दिवसांमध्ये तब्बल ११३ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरला असून तीन जणांनी निवडणूक अधिका-यांकडे प्रत्यक्ष अर्ज दाखल केला आहे.

शुक्रवारी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून उमेदवारांना ३ फेब्रुवारीपर्यंत आपला अर्ज दाखल करता येणार आहे. अमावस्येची सावली टाळण्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र नाशिकमध्ये पाहावयास मिळाले होते. हा अर्ज इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट निवडणूक निर्णय अधिका-यांकडे जमा करायची आहे.

शनिवारी ८२ इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले. तर अनंत देवराम सूर्यवंशी, मसकुद इलियास खान, व संदीप नानासाहेब कमोद या तीन उमेदवारांनी त्यांचे अर्ज निवडणूक अधिका-यांकडे सादर केले असल्याची माहिती महापालिकेने दिली. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे रविवारीदेखील अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन देखील विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर न केल्याने इच्छुकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.