नाशिक – तालुक्यातील शिलापूर येथे नाशिक इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब (सीपीआरआय) साकारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे बुधवारी दुपारी दोन वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष उपस्थितीत उदघाटन होणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकलचे साडेचारशेहून अधिक लघु आणि माध्यम उद्योग आहेत. त्यांना इलेक्ट्रिकल पॅनल्स आणि इतर वीज उपकरणांच्या निर्मितीनंतर चाचणीसाठी सध्या भोपाळ आणि बंगळुरु येथे जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब स्थापन करण्याची उद्योजकांची मागणी होती. याबाबत तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उद्योजकांना सदर प्रयोगशाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली. शिलापूर येथे शंभर एकरमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
केंद्रीय विद्युत संशोधन संस्था म्हणजेच सेन्ट्रल पॉवर इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खात्याने पश्चिम भारतात इलेक्ट्रिक चाचणी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. जुलै २०१३ मध्ये अधिकाऱ्यांनी नाशिक येथे जागेची पाहणी केली. त्यानंतर २७ जुलै २०१३ रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सीपीआरआयचे महानिदेशक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिलापूर येथील शंभर एकर जागा नाममात्र दराने देण्याची तयारी दर्शवून तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील आणि सीपीआरआयचे महानिदेशक यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आणला. त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे २१६ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार अधिक निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.