घरातल्या कचऱ्यातूनही होऊ शकतो आर्थिक लाभ- श्रीकांत नावरेकर

‘जीवनउत्सव’ जीवनशैली सप्ताहात ‘कचरा व्यवस्थापन’ कार्यशाळेत मार्गदर्शन

nashik, garbage, environment
३० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या ‘जीवनशैली सप्ताहात’ विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

घरातील कचरा बाहेर फेकण्याऐवजी त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास या कचऱ्यापासून आर्थिक लाभही मिळू शकतो. रोजच्या जगण्यात साध्या सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास आरोग्यदायी, पर्यावरणपूरक जीवनशैली जगता येत असल्याचे प्रतिपादन निर्मलग्राम निर्माण केंद्राचे संचालक श्रीकांत नावरेकर यांनी केले.

कॉलेज रोड येथील श्रद्धा मॉल येथे सुरू असलेल्या ‘जीवनउत्सव’ या जीवनशैली सप्ताहातील ‘कचरा व्यवस्थापन’ कार्यशाळेत ते बोलत होते. ‘कमी कचरा’ याऐवजी ‘शून्य कचरा’ ही संकल्पना राबविणे सहज शक्य आहे. घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे दोन वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये वर्गीकरण करावे. यानंतर घराच्या बाल्कनीमध्ये ओल्या कचऱ्याचे छोट्या पेटीमध्ये गांडूळखत तयार करता येते. या खताचा वापर कुंड्यांमध्ये केल्यास खताचे पैसे वाचतात. तर सुक्या कचऱ्यापासून कागद, काच, कापड वेगवेगळे करून त्यापासून पिशव्या, शोभेच्या वस्तू अशा विविध टिकाऊ वस्तू तयार करता येतात. त्यामुळे या वस्तूंच्या पुनर्वापरातून आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यातूनच शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणता येते, असेही ते यावेळी म्हणाले.

३० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या ‘जीवनशैली सप्ताहात’ विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक, आरोग्यदायी, तणावमुक्त जीवनशैली सोप्या पद्धतीने जगण्यासाठी नाशिकमध्ये गेल्या ८ वर्षांपासून जीवनउत्सव या जीवनशैली सप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिली.

या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनात स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी, सेंद्रिय गुळ, ईशान्येकडील गोविंदभोग तांदूळ, टाकाऊ कागद व कापडापासून तयार केलेल्या वस्तू, सेंद्रिय अन्नधान्य व मसाले, आग्या मोहोळाचा मध, खादीचे कपडे असे विविध गोष्टी उपलब्ध आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रतिभा भटेवरा यांनी केले. संध्या नावरेकर, गौतम भटेवरा, मुकुंद दीक्षित, डॉ. धनंजय अहिरे आदी यावेळी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nashik environment garbage shrikant navrekar