धुळे : असुद्दीन ओवेसी यांच्यासारखा नेता कधी झाला नाही. आणि होणारही नाही. ओवेसी हे माझे आधीही नेते होते आणि आताही तेच नेते राहणार आहेत, अशी भावना एमआयएमचे माजी आमदार फारूक शहा यांनी राष्ट्रवादीतील (अजित पवार) प्रवेशानंतर व्यक्त केली. शहरात शांतता नांदावी म्हणून आपण अजित पवार गटात प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले.

शहा यांचा अजित पवार गटात प्रवेश झाल्यावर त्यांनी प्रमुख समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी केवळ धर्मासाठी आणि समाजासाठी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मदत करुन चूक केली काय, असा प्रश्नही त्यांनी केला. मालेगाव येथील निर्दोष लोकांवर अन्याय होत असतांना क्ष दिले जात नाही. चुकीचे कागदपत्र असल्याची कारणे दाखवून त्यांना अटक केली जात आहे. असे असतांना मालेगाव येथील एमआयएमचे आमदारही काही करू शकलेले नाही, अशी नाराजी शहा यांनी व्यक्त केली.

शहा यांचे कार्यकर्त्यांच्या बैठकीतील भाषण समाजमाध्यमात प्रसारित झाले आहे. दरम्यान, ओवेसी यांची शहा यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाविषयीची प्रतिक्रियाही समाज माध्यमात फिरत आहे. अजित पवार यांनी देऊ केलेले कुठपर्यंत पुरणार, असा प्रश्न करुन एक, दोन वाहने आणि कपडे यांशिवाय आणखी काही वस्तू मिळाल्या असल्या तरी धर्माच्या दृष्टीने ते बरे नसल्याचे ओवेसी यांनी नमूद केले आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारूक शहा यांना एमआयएमने धुळ्यातून उमेदवारी दिली होती. त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि लोकसंग्रामकडून माजी आमदार अनिल गोटे हे प्रतिस्पर्धी होते. तिघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात फारूक शहा यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे एमआयएमने धुळे जिल्ह्यात प्रथमच शिरकाव केला होता. परंतु, मालेगाव मध्य आणि धुळे शहर विधानसभा मतदार संघातून दोन आमदारांचा लाभ झाल्यावरही एमआयएमने २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघात अधिकृत उमेदवार दिला नाही. काँग्रेसतर्फे डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाली. एमआयएमने भाजपला पराभूत करण्यासाठी डॉ. बच्छाव यांना पाठिंबा दिला. बच्छाव यांना विजयाच्या समीप नेण्यात एमआयएमने महत्वाची भूमिका वठवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. शोभा बच्छाव यांच्यासमोर भाजपतर्फे तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून उभे ठाकलेले माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत फारुक शहा यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हांपासून त्यांच्या राजकीय हालचाली काहीशा निस्तेज झाल्या होत्या. अजित पवार गटातील प्रवेशानंतर शहा हे पुन्हा चर्चेत आले आहेत.