नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीमध्ये सासाऱ्यानेच आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एक महिलेने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन मुख्य संशयितांना बलात्कार आणि कौटुंबिक हिंसेच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर रोड येथील आनंदवली येथे राहणाऱ्या पीडित महिलेने सासरे अशोक जाधव, पती आकाश जाधव आणि सासू प्रमिला जाधव विरोधात तक्रार नोंदवली आहे. १ फेब्रुवारी २०१९ ते १८ मार्च २०१९ या कालावधीमध्ये सासऱ्यांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सासरा अशोक जाधव याने राहत्या घरी तसेच चांडक सर्कलजवळील निर्जन ठिकाणी इनोव्हा गाडीमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच बलात्कार केल्यानंतर या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुला मुलाबरोबर नांदू देणार नाही अशी धमकीही सासऱ्यांनी दिल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून या महिलेने घडलेल्या प्रकाराची माहिती आपला पती आकाश आणि सासू प्रमिलाकडे केली. त्यावेळी त्यांनी तिची बाजू घेण्याऐवजी तिचा छळ करण्यास सुरुवात करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तिघांनी या महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. सासूने आपल्या हाताची नस कापून आपल्याला दुखापत केल्याचेही या पीडित महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तिघांकडून वारंवार होणारी मारहाण आणि त्रास असहाय्य झाल्याने या महिलेने गंगापूर पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अचंल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. पवार करत आहेत.