नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे आहेत. कारण, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर, तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात तात्पुरता मंडप, व्यासपीठ, कमान उभारणीच्या परवानगीसाठी अखेरच्या मुदतीपर्यंत महापालिकेकडे ५७९ मंडळांनी अर्ज दाखल केले. गतवर्षी परवानगी मिळालेल्या गणेश मंडळांची संख्या ४४४ होती. जाहिरात कर आणि मंडप शुल्काबाबत निर्णय झाल्यानंतर मंडळांना परवानगी देण्याचे काम सुरू होणार आहे.
गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्यासाठी विविध सार्वजनिक मंडळे अर्ज करतात. महापालिका अधिनियमान्वये महापालिका पोलीस विभागाच्या सहमतीने परवानगी देते. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात आली. यंदा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या चांगलीच वाढली आहे. विहित मुदतीत ५७९ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. मागील वर्षीच्या तुलनेत विचार केल्यास यंदा अर्ज करणाऱ्या मंडळांची संख्या १३५ ने वाढली. त्याचा संबंध महापालिका निवडणुकीशी असून या उत्सवातून इच्छुकांनी प्रचाराची तयारी केलेली आहे.
महापालिकेत अलीकडेच झालेल्या बैठकीत मंडप शुल्क व जाहिरात कराला सर्वच गणेश मंडळांनी कडाडून विरोध केला होता. स्वागत कमानी उभारण्यासाठी मनपा प्रत्येकी ७५० रुपये आणि तेवढीच रक्कम मंडप शुल्क म्हणून घेतली जाते. तर जाहिरात करापोटी प्रति चोरस फूट प्रतिदिन ३० रुपये आकारले जातात. हे सर्व कर आणि शुल्क माफ करण्यासाठी मंडळे मुख्यत्वे आग्रही आहेत. स्वागत कमानीतून इच्छुकांना स्वत:ची छबी झळकवता येईल. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर झाली आहे. लवकरच ती हरकती व सुनावणीसाठी प्रसिद्ध होणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना गणेशोत्सवाचा पुरेपूर लाभ घेण्याचा माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा प्रयत्न आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याबरोबर कार्यकर्त्यांचे संघटन करण्यात या उत्सवाची मदत होणार असल्याचे अनेक जण मान्य करतात.
गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ते जोडले जातात. समर्थक वाढतात. महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. मंडळांची संख्या वाढण्याचा संबंध निवडणुकीशी आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव साजरा केला जातो. काही भागात नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. – गजानन शेलार (माजी नगरसेवक तथा संस्थापक दंडे हनुमान मित्र मंडळ)