नाशिक – गणरायाच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतांना घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणरायांची मूर्ती नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सगळ्यांचे लाडके आराध्यदैवत असलेले गणराय आपल्या हव्या त्या रुपात घरात वा मंडळात आणण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू असतांना विक्रेते मात्र वेगळ्याच चिंतेत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे कोकण, पनवेल भागातून मूर्ती आणतांना झालेले नुकसान, पावसामुळे रंगकामातील अडचणी विक्रेत्यांसमोर उभ्या आहेत.

गणेशोत्सवास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. यंदा उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. गणराय वेगवेगळ्या रुपात आणण्यासाठी नाशिककरांची लगबग पाहण्यासारखी आहे. यामध्ये बालाजी गणेश, दगडु गणपती, दागिना गणपती, लालबागचा राजा, ढोल्या गणपती, मोदकेश्वर अशा वेगवेगळ्या रुपात गणपतीची विविध रुपे भाविकांना आकर्षित करत आहेत.

उत्सवाचा साज असला तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने बाजारात पर्यावरणपूरक अशा शाडुमातीच्या गणेश मूर्तीं बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. यामध्ये साधारणत: हजार रुपयांपासून पुढे एक फुटाच्या मूर्ती मिळत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी प्रमाणात बाजारात आल्या आहेत. या मूर्तींना आकर्षक रंगसंगती, दागिने यामुळे या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

याविषयी मानाचा राजा गणेश केंद्राचे जयेश खिरोडे यांनी माहिती दिली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दोन फुटापुढील उंचीत दागदागिने, वस्त्र याशिवाय अर्थात कलाकाराने रंगवलेल्या साध्या अशा पाच ते सहा हजार रुपये दराने मूर्ती जात आहेत. गणरायाची आभुषणे, पिंताबर याला कुंदन वर्क, काठ याचा वापर केलेल्या मूर्तींची आठ हजार रुपयांपुढे विक्री होत आहे.

यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदीचा वाद उदभवला. अखेर नऊ जून रोजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली. त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी कमी वेळ मिळाला. तसेच मूर्ती तयार करण्याचा कालावधी मेमध्ये असतो. त्या वाळतातही. मात्र मे मध्ये पाऊस असल्याने मूर्ती तयार करता आल्या नाहीत. याचा परिणाम मूर्ती कमी प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्याचा परिणाम दरावर होत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद असला तरी कल पर्यावरणपूरक मूर्तींना अधिक असल्याचे खिरोडे यांनी सांगितले.

शाडुमाती मूर्ती विक्रेते दीपक वैद्य यांनी, यंदा बाजारात शाडुमातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले. परंतु, या मूर्तींना रेखीवता नाही. मे महिन्यात झालेल्या पावसाचा फटका मूर्तींना बसला आहे. रंगकाम, रेखीवता यामध्ये तडजोड करावी लागत आहे. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्ते खराब झाले असून दुकानापर्यंत येईपर्यंत मूर्तींचे नुकसान होत आहे. रेखीवता, रंगकाम, सुबकता या निकषावर शाडुमातीची मूर्ती महाग आहे. यामध्ये तडजोड केली तर ती ५०० रुपयांच्या पुढेही मिळत आहे. ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेवर बाजारपेठेचे अर्थकारण अवलंबून असल्याचे वैद्य यांनी नमूद केले.