नाशिक – गणरायाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि खिरापत. गणेशोत्सवात हा आवडता प्रसाद तयार करणे काहिसे महागले आहे. यासाठी लागणारे प्रमुख जिन्नस खोबरे, त्याचीच किंमत महिनाभरात किलोला दीडशे रुपयांनी वाढली. सुका मेव्याच्या किंमती देखील प्रति किलोला ५० ते १०० रुपयांनी उंचावल्या असल्या तरी लाडक्या गणरायाला आवडता प्रसाद देण्यात भक्तांचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मोदक व खिरापतीसाठी खोबरे, मोदक पीठासह सुका मेव्याला मोठी मागणी आली आहे. गणेश चतुर्थी अर्थात बुधवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, आरास याकडे भक्तांकडून बारकाईने लक्ष दिले जाते, तसेच गणरायासाठी आवडीचा प्रसाद देण्याचा साकल्याने विचार होतो. शहरातील किराणा दुकानांमध्ये खास गणेशोत्सवातील प्रसादासाठी लक्षणिय खरेदी होत आहे. विविध प्रकारचे तयार मोदक मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु, गृहिणींचा कल घरात स्वत: तयार केलेल्या मोदकांकडे असतो. मोदक, खिरापतीसाठी खोबरे हा प्रमुख घटक आहे. एक, दीड महिन्यांपूर्वी प्रति किलो ३०० रुपयांना असणारे खोबरे आता ४५० रुपयांवर पोहोचले आहे. हे दर वाढण्याचे कारण नारळाच्या जागेवर होणाऱ्या खरेदीत असल्याचे नाशिक जिल्हा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती सांगतात. जागेवर खरेदी होत असल्याने मालाची उपलब्धता कमी आहे. खोबऱ्याबरोबर काजू, बदाम, अंजिर अशा सुका मेव्याच्या दरात सरासरी ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
दरवाढ झाली असली तरी खरेदीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खोबरे, मोदक पीठ, सुका मेवा आदींना चांगली मागणी असल्याचे संचेती यांनी सांगितले. पंचखाद्ययुक्त खिरापतही बाजारात आहे. यामध्ये सुका मेवा, काजू, बदाम, किसमिस, चारोळी, वेलची पूड, गुलाब पाकळी आदींचा अंतर्भाव असतो. प्रति किलो ६०० रुपयांनी ही खिरापत विकली जात असून तिला भक्तांची पसंती मिळाली आहे.
प्रत्येक सण हा उत्सव असतो. त्यात गणेशाचे आगमन म्हणजे आनंदाचा सोहळा. प्रत्येक दिवशी नवीन नवैद्य आणि वेगवेगळ्या मोदकांचा प्रसाद. उकडीचे, मैद्याचे, खव्याचे आणि कितीतरी प्रकारचे मोदक तयार करायचा आनंद एक गृहिणी म्हणून मिळतो. त्यामुळे नोकरी करून आवर्जुन वेळ काढला जातो. त्यात महागाईचा आलेख दिवसागणिक वाढतो आहे. खोबरे, साखर, तूप यांचे भाव अचानक बदलतात. तरी गणरायाच्या आगमनात आपण तिळमात्र काहीही कमी पडू देत नाही. – डॉ. वर्षा हेंबाडे