नाशिक – भाजपमध्ये शिस्त आणि व्यवस्था आहे. तिथे संघटना वेगळी आणि लोकप्रतिनिधी वेगळे असे कामकाज चालते. या धर्तीवर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) नागरिकांच्या समस्या सोडविणे, त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी व्यवस्था गरजेची आहे. पक्षात शिस्त आणि व्यवस्था असल्यास गटबाजी देखील चव्हाट्यावर येत नाही. गटबाजी चव्हाट्यावर आल्यास पक्षाची अडचण होते. नाशिकसह राज्यातील मंत्र्यांनी संघटनेला ताकद देण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष संघटनेतील उणिवांवर बोट ठेवले. शिंदे गटातील मंत्र्यांकडून संघटनेला बळ दिले जात नसल्याचे एकप्रकारे अधोरेखीत केले.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकींच्या तोंडावर शिंदे गटातील गटबाजी उफाळून आली आहे. मध्यंतरी वरिष्ठांनी हस्तक्षेप करीत दोन-तीन गटांतील मतभेद मिटवून एकवाक्यता राखण्याची सूचना केली होती. ठाकरे गटाला सुरुंग लावताना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. या स्थितीला वैतागून माजी खासदार गोडसे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या पहिल्या काही जणांमध्ये गोडसे यांचा समावेश होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेत भाजप ठाकरे गटासह अन्य पक्षांतील प्रमुख नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी फासे टाकत आहे. यात शिंदे गटाचे माजी खासदार गोडसेही गळाला लागल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द गोडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपला विश्वास असल्याचा दावा केला.
शिंदे गटातील प्रमुख नेत्यांविषयी आपली नाराजी नाही. पक्षांतर्गत शिस्त व व्यवस्था असणे निवडणुकीसाठी फायदेशीर ठरेल. हा विषय वरिष्ठांकडे अनेकदा मांडला. जिल्ह्यात पक्षाचे दोनच आमदार आहेत. १४ विधानसभा मतदारसंघात संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी नियुक्ती महत्वाची आहे. उपमु्ख्यमंत्री शिंदे हे सर्वतोपरी काम करतात. संपूर्ण राज्यात पक्षाचे मंत्री असून त्यांनी संघटनेच्या कामात लक्ष घातले तर संघटना मजबूत होईल. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
रोख कोणाकडे ?
पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहू शकणार नाहीत. प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांनी संघटनेला ताकद दिल्यास त्यांच्यावरील भार कमी होईल. जिल्हा पातळीवरील विषयांना स्थानिक स्तरावर न्याय देता येईल. लहान-मोठ्या गोष्टींसाठी पक्ष नेतृत्वाकडे जाण्याची गरज पडणार नाही, असे गोडसे यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाचे दादा भुसे हे मंत्री आहेत. त्यांच्यावर आपला रोख आहे का, या प्रश्नावर गोडसे यांनी आपण कुठल्याही एका मंत्र्यांविषयी बोललो नसल्याचे स्पष्ट केले. अनेक मतदारसंघात दुसऱ्या पक्षांचे आमदार आहेत. तिथे संघटना मजबूत झाल्यास चांगले उमेदवार उभे करता येतील. अधिक जागांची मागणी करता येईल, शिस्त आणि पक्षीय व्यवस्था असल्यास गटबाजी नियंत्रित राहील. चव्हाट्यावर येणार नाही, असा दावा गोडसे यांनी केला.