नाशिक – शहरातील हॉटेल नियमावलीचे पालन करून व्यवसाय करतात. कर भरतात. निवासासाठी येणाऱ्या ग्राहकांसह त्यांच्या समवेतच्या व्यक्तींची वहीत नोंद होत असते. त्यामुळे शहरातील हॉटेलमध्ये गैरप्रकार होत नाहीत. ज्यांना कुठलेही नियम लागू नाहीत, ज्यांच्यावर यंत्रणांचे नियंत्रण नाही, अशा धरणांलगतच्या आणि ग्रामीण भागातील अनधिकृत खासगी व्हिला, रिसॉर्टमध्ये गैरप्रकार घडतात, असा आरोप नाशिक हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केला आहे.
राज्यात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात नाशिक शहरातील हॉटेलचाही उल्लेख झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात कुठेच हनीट्रॅप नसल्याचे स्पष्ट केले असतानाही नाशिकमधील त्या हॉटेलविषयी चर्चा थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर, नाशिक हॉटेल व्यावसायिक संघटनेने या घटनाकमावर भूमिका मांडली. मागील कुंभमेळ्यात शहरात २०० हून अधिक लहान-मोठ्या हॉटेलांमध्ये दोन हजार खोल्या होत्या. मधल्या काळात यामध्ये वाढ झाली असेल. या सर्व हॉटेलांमधील खोल्या नोंदणीचे काम ऑनलाईन स्वरुपात ९० खासगी प्रवासी कंपन्यांकडून होते. प्रत्यक्ष हॉटेलमध्ये येऊन नोंदणी करणाऱ्यांची संख्या जेमतेम पाच ते १० टक्के असल्याचे नाशिक हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले.
हॉटेल व्यवसाय सुरू करताना विविध विभागांकडून परवानग्या घ्याव्या लागतात. ऑनलाईन खोली नोंदणीची सुविधा देणाऱ्या कंपन्या ग्राहकाचे आधार आणि पॅनकार्ड घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करतात. संबंधित ग्राहक हॉटेलमध्ये आल्यावर व्यवस्थापन पुन्हा आवश्यक ती कागदपत्रे घेऊन त्याच्याबरोबर किती व्यक्ती आहेत, याची वहीत नोद करते. या दस्तावेजांचे जतन होते. परदेशी नागरिक असल्यास ऑनलाईन अर्ज भरला जातो. सीसीटीव्ही कॅमेरे असतात. हॉटेल व्यावसायिकास नियमाचे पालन करून व्यवसाय करावा लागतो. कर भरावा लागतो. त्यामुळे अशा ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता नसते, असा दावा चव्हाण यांनी केला.
अनधिकृत खासगी व्हिला, रिसॉर्टवर दोषारोप
नाशिक जिल्ह्यात लहान-मोठी २६ धरणे असून धरणांच्या परिसरात आणि ग्रामीण भागात इतरत्र शेकडो खासगी व्हिला, रिसॉर्ट अनधिकृतपणे उभे राहिलेले आहेत. त्यांना हॉटेलप्रमाणे कुठलेही नियमन नाही. त्यांच्यावर यंत्रणांचेही नियंत्रण नाही. अशा ठिकाणी हनीट्रॅपसारखे गैरप्रकार वा अन्य उद्योगांचा सुळसुळाट होतो, असा आरोप हॉटेल संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केला.
पर्यटकांनी दक्षता घेण्याची गरज
खासगी व्हिला, रिसॉर्टमध्ये नोंदणी करताना पर्यटकांनी संबंधित ठिकाणाची अधिकृतता पडताळण्याची आवश्यकता आहे. उपरोक्त स्थळ नोंदणीकृत आहे का, आवश्यक त्या शासकीय परवानग्या त्यांनी घेतल्या की नाहीत, याची तपासणी करून नोंदणी करावी, असा सल्ला हॉटेल व्यावसायिक संघटनेने दिला आहे. अशा ठिकाणी ऑनलाईन नोंदणीसाठी अनेक अनधिकृत ॲपचा वापर होतो. त्यांच्यासाठी नियमावलीची गरज संघटनेने मांडली आहे.