scorecardresearch

नाशिक: दोन वर्षानंतर निमाच्या कामकाजाचा श्रीगणेशा; नवनियुक्त २१ विश्वस्तांकडे कार्यभार

गटातटाचे राजकारण, परस्परांवर कुरघोडीची स्पर्धा, अंतर्गत मतभेद आदी कारणांनी जवळपास दोन वर्षांपासून ठप्प असणारे नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) संस्थेच्या कामकाजाचा नववर्षात श्रीगणेशा झाला आहे.

नाशिक: दोन वर्षानंतर निमाच्या कामकाजाचा श्रीगणेशा; नवनियुक्त २१ विश्वस्तांकडे कार्यभार
(नाशिक येथील निमा संस्थेच्या कार्यालयात कार्यभार स्वीकारताना धनंजय बेळे यांच्यासह नवनियुक्त विश्वस्त)

गटातटाचे राजकारण, परस्परांवर कुरघोडीची स्पर्धा, अंतर्गत मतभेद आदी कारणांनी जवळपास दोन वर्षांपासून ठप्प असणारे नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) संस्थेच्या कामकाजाचा नववर्षात श्रीगणेशा झाला आहे. धर्मदाय सहआयुक्तांनी निमाच्या नवनियुक्त २१ विश्वस्तांकडे निमाचा कार्यभार सोपविला. प्रशासक नियुक्तीमुळे दोन वर्षे उद्योगांच्या समस्या, प्रश्न रखडले होते. आता विश्वस्तांवर जबाबदारी आल्याने प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे दृष्टीपथास आले आहे. शिवाय, पुढील काळात संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये प्रथमच इ कचरा संकलन मोहिमेची तयारी

जिल्ह्यातील उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निमा संस्थेतील कामकाज पदाधिकाऱ्यांमधील मतभेदामुळे ठप्प झाले होते. दोन वर्षांपासून संस्थेवर सहधर्मदाय आयुक्तांकडून प्रशासक नेमले गेले. विश्वस्त पदासाठी इच्छुकांमधून सर्वसहमतीने सात नावे सुचविण्याचा पर्याय दिला गेला होता. तथापि, गटातटाच्या राजकारणामुळे या नावांवर एकमत झाले नाही. सर्व गटांनी परस्परांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली होती. नावांवर एकमत होत नसल्याने अखेर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने विश्वस्त नेमणुकीसाठी मुलाखतीची प्रक्रिया राबवून प्राप्त झालेल्या अर्जांमधून २१ जणांची विश्वस्तपदी नियुक्ती केली. सहायक धर्मदाय आयुक्त रामानंद लिपटे यांनी माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह २१ विश्वस्तांकडे निमा कार्यालयाचा कार्यभार सोपविला. यावेळी त्यांनी धर्मादाय सहआयुक्तांनी दिलेल्या अटी-शर्ती व निमाच्या १९८२ च्या घटनेनुसार कारभार करावा, असा सल्ला दिला. विश्वस्तांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा >>>‘संजय राऊत यांचे नाशिक दौरे अर्थकारणासाठीच’; टिकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर

यावेळी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, डी. जी. जोशी, रमेश वैश्य यांनीही विश्वस्तांना शुभेच्छा दिल्या. गोगटे यांनी निमाला मदत म्हणून ११ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. इतर माजी अध्यक्ष, सभासद यांनी निमाला सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ उपस्थित होते. विश्वस्तांच्यावतीने धनंजय बेळे यांनी निमाला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल, विश्वस्तांकडून अधिकाधिक चांगले काम केले जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, मतभेद विकोपाला गेल्यामुळे निमाची निवडणूक प्रक्रियाही रखडली होती. विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे या प्रक्रियेचा मार्ग पुढील काळात खुला होणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 10:56 IST

संबंधित बातम्या