scorecardresearch

‘संजय राऊत यांचे नाशिक दौरे अर्थकारणासाठीच’; टिकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर

राऊत हे राज्यसभा निवडणुकीत एक मताने पडले असते. ज्या आमदारांनी त्यांना मते दिली, त्यांना ते गद्दार म्हणतात. त्यांनी मते दिली नसती तर राऊत यांची अनामत जप्त झाली असती, असा टोलाही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे.

‘संजय राऊत यांचे नाशिक दौरे अर्थकारणासाठीच’; टिकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या टीकेला नाशिकमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांचे नाशिक हे पर्यटनस्थळ आहे. शनिवार, रविवार या दिवशीच ते येथे येऊन बडगुजर आणि कंपनीकडून हिशेब घेऊन जातात. त्यांच्या कार्यपध्दतीने पक्षाचा ऱ्हास झाला, असा शब्दात शिंदे गटाने राऊत यांच्यावर आगपाखड केली. शिवराळ भाषेचा वापर, कंबरेखालचे बोलणे यातून राऊत यांचे संस्कार दिसतात. संपादक असणाऱ्या व्यक्तीने बोलताना तारतम्य बाळगायला हवे. ही परिस्थिती का ओढावली, याचे आत्मपरीक्षण करावे. ज्या आमदारांनी मत देऊन त्यांना राज्यसभेत पाठवले, त्यांनाही ते गद्दार म्हणतात. आपण कसे निवडून आलो, याचाही त्यांनी अभ्यास करावा, असे सल्ले स्थानिक शिंदे गटाने दिले.

हेही वाचा- नाशिक : चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत

नाशिक दौऱ्यात राऊत यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांचा नाशिक दौरा अर्थकारणासाठी असतो, असा आरोपही करण्यात आला. पक्षांतर केलेल्या पदाधिकाऱ्यांना आपण ओळखत नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यासोबतची छायाचित्रे सादर केली. मनपा सभागृहात वंदे मातरम् म्हणण्यास नकार देणाऱ्या माजी नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी बिर्याणीवर ताव मारल्याकडे लक्ष वेधले. खासदार हेमंत गोडसे यांनी राऊत हे राज्यसभा निवडणुकीत एक मताने पडले असते. ज्या आमदारांनी त्यांना मते दिली, त्यांना ते गद्दार म्हणतात. त्यांनी मते दिली नसती तर राऊत यांची अनामत जप्त झाली असती, असा टोला लगावला. राऊतांचे नाशिक हे पर्यटनस्थळ आहे. याआधी शिवसैनिकांनी त्यांना पळवून लावले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमवेत आघाडी करून राऊत यांनी हिंदुत्वाला तडा दिला. उलट शिंदे गटाने शिवसैनिकांना थोपवून ठेवण्याचे काम केले. इतके आमदार, खासदार पक्ष सोडूनही राऊत चुकीची विधाने करीत आहेत. शेवटी ठाकरे गटात ते एकटेच शिल्लक राहतील. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना ते चुकीची माहिती देतात. यापुढेही अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शिंदे गटात येणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला.

हेही वाचा- जळगाव: गोद्रीतील महाकुंभ म्हणजे बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार – बाबूसिंग महाराज यांचे प्रतिपादन

बोरस्ते यांनी पक्षातील स्थितीबाबत राऊत यांच्याकडे पाच वेळा तक्रार करूनही दखल घेतली नाही, उलट आपल्या निवडक लोकांना त्रास व्हायला नको म्हणून इतर गेले तरी बरे, अशी त्यांची मानसिकता राहिल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कार्यकारी दंडाधिकारी देता आले नाहीत. कित्येक वर्षापासून पक्षात तेच पाच ते दहा पदाधिकारी दिसतात. नव्या व्यक्तींना जोडण्याचे प्रयत्न झाले नाहीत. राऊत यांचा दौरा विस्कळीत होता. कुठलेही नियोजन नव्हते. त्यामुळे त्यांची चिडचिड झाली. या स्थितीचाही त्यांनी विचार करावा. यापुढे राऊत हे आमच्यासाठी बेदखल असतील. त्यांच्या आरोपांना कुठलेही उत्तर दिले जाणार नाही. नाशिकच्या शहरातील प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. बुधवारी तिसरी बैठक होणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा- जळगाव: शिंदखेड्यातील भूमी अभिलेख लिपिक लाच घेताना जाळ्यात

आरोप तथ्यहीन

संजय राऊत यांचे आरोप बोरस्ते यांच्या फार जिव्हारी लागल्याचे दिसते. या रागातून त्यांनी पत्रकार परिषदेतून राऊत यांच्यावर बेछूट आरोप केले, त्यात कुठलेही तथ्य नसल्याचा दावा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. नेते पैसे घेतात म्हणून आरोप केले गेले. आपण १० वर्ष पक्षात होता, मुख्य पदावर होता, आपण किती पैसे दिले-घेतले, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान बडगुजर यांनी दिले. नेत्यांनी जर पैसे घेतले असते तर आपणही पाच वर्षे त्या पदावर राहू शकला नसतात. कारण पैसे देणारे खूप तयार असतात. निष्ठेने काम करणारे कमी असतात. नेता नेहमी निष्ठेने काम करतो. त्यामुळे चुकीचे आरोप नेत्यांवर करू नका. आपल्या मर्यादेत राहा. आपण ज्या पक्षात गेलात, त्या पक्षात निष्ठेने काम करा. शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना डिवचू नका. निवडणुकीत कोणाची किती क्षमता आहे, ते लवकरच कळेल. घोडा मैदान फार लांब नाही, याकडे बडगुजर यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 20:12 IST

संबंधित बातम्या